हिवाळी अधिवेशन : आरटीपीसीआर तपासणीनंतरच प्रवेश; विधानमंडळाच्या सचिवांची सूचना

नीलेश डोये
Saturday, 7 November 2020

विधानभवन, आमदार निवास, सुयोग, तसेच निवास व्यवस्था असलेल्या सर्व इमारती निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही सुरू करावी, विधानभवनातील प्रत्येक दालनाच्या बाहेर सॅनिटायजर मशीन बसविण्यात यावी, अशी सूचना भागवत यांनी केली.

नागपूर : मुंबई येथे झालेल्या अधिवेशन प्रमाणेच कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीनंतरच विधानभवनात प्रवेश देण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे तसेच चाचणीचा अहवाल नियोजित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे. चाचण्या मोठ्या प्रमाणात अपेक्षित असल्यामुळे त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना, महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिल्या.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा विधानभवन सभागृहात सचिव राजेंद्र भागवत यांनी घेतला. यावेळी विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले, अध्यक्षांचे विशेष कार्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने, सभापतीचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रवींद्र जगदाळे, मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले तेली, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त आशा पठाण, अतिरिक्त पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त बसवराज तेली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे व आरोग्य विभागाचे अधिकार उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

विधानभवन, आमदार निवास, सुयोग, तसेच निवास व्यवस्था असलेल्या सर्व इमारती निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही सुरू करावी, विधानभवनातील प्रत्येक दालनाच्या बाहेर सॅनिटायजर मशीन बसविण्यात यावी, अशी सूचना भागवत यांनी केली.

विधिमंडळाच्या सदस्यांना मास्क, सॅनिटायझर असलेली कीट दररोज उपलब्ध करून देण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नियोजन करावे. आमदार निवास येथे कोविड सेंटर असल्यामुळे येथील संपूर्ण निवास व्यवस्थेसंदर्भातील खबरदारी घेऊन संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण होईल याबाबत खबरदारी घेण्याबाबतही बैठकीत सूचना करण्यात आली.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश राहणार आहे. प्रवेशापूर्वी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. या चाचण्या करण्यासाठी आमदार निवास, कर्मचारी निवासस्थान, रविभवन आदी सात ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली. पोलिस विभागातर्फे विधानभवन, आमदार निवास येथील सुरक्षेसंदर्भात सिक्युरिटी ऑडिट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entered the Legislature only after RT PCR examination