सव्वादोन लाख रुपये वीजबिल पाहून लागला 'करंट' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

कला पंडित यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी महावितरणने नुकसानभरपाई देण्याची मागणी समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली आहे. 

नागपूर : महावितरणचा आखणी एक प्रताप उघडकीस आला आहे. महालात राहणाऱ्या कला पंडित यांना एक महिन्याचे 2 लाख 16 हजार 420 रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कुणीही राहत नसलेल्या बंद फ्लॅटचे हे बिल आहे. अव्वाच्या सव्वा आलेल्या वीजबिलाचा पंडित यांनी धसका घेतला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. 

विदर्भ राज्य आंदोलन समितीने या प्रकरणाला वाचा फोडली आहे. कला पंडित यांच्या मालकीचा महालातील छोटे आयचित मंदिराजवळ असणाऱ्या गोपाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. जून 2019पर्यंत कला पंडित याच फ्लॅटमध्ये वास्तव्यास होत्या. त्या नियमित बिलाचा भरणा करीत होत्या. जून 2019 मध्ये त्या फ्लॅट सोडून नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेल्या. तेव्हापासून त्यांचे घर बंदच आहे. यानंतरही कर्तव्यभावनेतून जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2019 च्या वीजबिलांचा नियमित भरणा केला. ऑक्‍टोबर 2019 मध्ये त्यांना तब्बल 2 लाख 16 हजार 420 रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले. या बिलाचा धसका घेत त्या आजारी पडल्याने त्यांची सून प्रिया पंडित यांनी सांगितले.

बिलासंदर्भात त्यांनी 30 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार केली. त्यांना 2 हजार 200 रुपये व्याजासह बिल पाठविण्यात आले. दरमहा शंभर रुपये प्रमाणे हफ्ते पाडून देण्यात आले. ऑक्‍टोबर ते जानेवारीदरम्यान त्यांनी वाढीव 400 रुपये भरले. मार्च 2020 मध्ये पुन्हा त्यांना 1 लाख 42 हजारांचे बिल पाठविण्यात आले. याबाबतचीही तक्रार केली. पण, अद्याप महावितरणने बिल दुरुस्त करून दिले नाही. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविला आहे. बिलात दुरुस्ती करून देण्यासोबतच कला पंडित यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी महावितरणने नुकसानभरपाई देण्याची मागणी समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी केली आहे. 

हेही वाचा : रेल्वेच्या बोगद्याखाली घातक शस्त्रांसह होते बसून; मग सुरू झाला 'खेळ' 

वैदर्भीयांचे वीजबिल माफ करण्याची मागणी 
कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यापार, शेती, रोजगार सर्वच बंद आहे. शासनाने ही बाब लक्षात घेऊन विदर्भातील जनतेचे वीजबिल माफ करावे. 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी. त्यानंतरच्या युनिटसाठी निम्म्या दराने बिलाची आकारणी करावी, अशी विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी आहे. या मागणीसाठी समितीने 7 जूनपासून आंदोलन आरंभले असून, लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excess electricity bill sent by Mahavitran