काम करीत असतानाचा कंपनीत झाला बारूदांचा स्फोट आणि क्षणार्धात उडाला हाहाकार...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

बाजारगाव (जि.नागपूर) :  संरक्षण दलाला स्फोटके पुरविण्याचे काम करणाऱ्या शिवा-सावंगा येथील इकॉनॉमिक्‍स स्फोटक कंपनीत शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सेल्फ रिफिलिंग डी-5 प्लांटमध्ये पूर्ण 1,200 डेटोनेटर राउंडचा स्फोट झाला. स्फोटके विखुरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी झालेल्या दोघा कामगारांना तत्काळ नागपूर येथे खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. या अपघातात तिघे जण किरकोळ जखमी झाले असून, एकूण पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

हेही वाचा  :  वाघिणीच्या हल्ल्यात बेसूरचे दोघे जखमी, बछडयांसह दबा धरून बसली होती शेतात

कामावर असताना झाला घात
प्राप्त माहितीनुसार शिवा-सावंगा येथील इकॉनॉमिक्‍स स्फोटक कंपनीत डिटेनोटर डी-5 सेल्फरिफिलिंग प्लांटमध्ये डेटोनेटरचे रिफिलिंग करीत असताना हा स्फोट झाला. त्यात काम करणाऱ्या 17 कामगारांपैकी सहा कामगार प्रीतेश जैथगुडे (वय 20, रा. सावंगा) याचा नागपूरला उपचारदरम्यान मृत्यू झाला. भूषण देवारे (वय 23), शिवा दत्थू बागडे (वय 51) हे गंभीर जखमी आहेत. भूषण पुंड (वय 23, बाजारगाव) व मुकेश धुर्वे (वय 21, सावंगा), नीलेश उके (वय 26), मुरली हे कामगार जखमी असून, धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा  :  रमजानच्या पवित्र महिन्यात ते करतात कोरोना रूग्णांची सेवा

मोबदला देण्याची मागणी
घटनेची माहिती कोंढाळी पोलिसांना मिळताच ठाणेदार श्‍याम गव्हाणे, पोलिस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव घटनास्थळी पोहोचले व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक राकेश ओला त्याचबरोबर सहायक जिल्हा पोलिस अधिकारी मोनिका राऊत यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. या भागाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते जि. प. सदस्य सलील देशमुख यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली व मृत कामगार व जखमींच्या कुटुंबाला योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य चंद्रशेखर कोल्हे, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, बाजार समिती सभापती तरकेश्वर शेळके यांनी भेट देऊन कामगारांचे सांत्वन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explosion in the Economics Explosive