शेतमालावर वादळी पावसाचं सावट, शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

गेल्या २०२०च्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. विदेशातून आलेला कोरोना महाराष्ट्रात व नागपुरात अतोनात वाढू लागला. त्यामुळे लॉकडाउन करण्यात आले होते. येथेही शेतकरीच डबघाईस आले.

मौदा (जि. नागपूर) : शेतकऱ्यांवरील संकट जाण्याचे नाव घेत नाही. टोळधाड, धानावर करपा, बुरशीजन्य रोग, सोयाबीनचे अती पावसाने नुकसान, महापूर, हभरऱ्यावरील मर रोग अशा अनेक समस्यांना तोंड देत शेतकरी जगत आहे. आता देखील हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा - Fastag Update : फास्टॅग असूनही भरावा लागला दुप्पट टोल, वाचा काय आहे कारण; टोल नाक्याबाहेर थाटली...

गेल्या २०२०च्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. विदेशातून आलेला कोरोना महाराष्ट्रात व नागपुरात अतोनात वाढू लागला. त्यामुळे लॉकडाउन करण्यात आले होते. येथेही शेतकरीच डबघाईस आले. शेतात पीक घेण्यास मनाई नव्हती. पण पीक बाजारात नेऊन विकण्याची बंदी, भाजीपाला काढून विकण्याचा पर्याय संपला होता. पाऊस आला आणि धानाचे रोवणे सुरू झाले. परंतु, मजुरांची कमतरता, त्यातही अवाढव्य भाव देऊन रोवणी करावी लागली. त्यातही खोडकीड, बुरशीजन्य रोग व अशा अनेक रोगाने धानाचे पीक अर्ध्यावर आले. यातही शेतकरी नुकसानीत राहिला. जास्त पाऊस आल्यामुळे सोयाबीन पिवळे पडले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले, काहींनी काढलेच नाही. त्यावरच रोटावेटर मारून अख्खे पीक जमिनदोस्त केले. धान निघाल्यानंतर काही शेतकरी वांगे, टमाटर व इतर भाजीपाला काढू लागले. पण यावरही निसर्गाने साथ दिली नाही. मिरची, वांगे, टमाटरला भाव नाही. कधीतरी शेतकरी निसर्गाची साथ मिळेल या आशेवर जगत आहे. परंतु, आज हरभरा व गव्हाला पाणी देण्याची वेळ आहे. परंतु, विद्युत विभागाने शेतकऱ्यांची वीज कापून पूर्ण कंबरच तोडली. प्रत्येक शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नाही. शेतात बोरवेल करून आपल्या शेतीकरिता पाण्याची सुविधा केली. त्यावरही वीज वितरण विभागाने विरजण घातले व वीज कापली. 

हेही वाचा - पत्नी सतत प्रियकराशी बोलते या संशयातून पतीने केला खून...

आता भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह वीज व गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे करण्यात येत आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन शेती करीत आहे. परंतु, निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी अजून कर्जबाजारी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famers facing problems due to rain in mouda of nagpur