शेतकऱ्यांची स्थिती झाली दोलायमान, काय असावे कारण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जून 2020

धानपिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 14,706 हेक्‍टर असून, तब्बल 6,000 पेक्षा अधिकचे क्षेत्र लागवडीखाली येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कापसाच्या लागवडक्षेत्रातही वाढ होण्याची शक्‍यता आहे.

रामटेक (जि. नागपूर) : मृग नक्षत्र सुरू झाले. तालुक्‍यात काही ठिकाणी सरी कोसळल्या तर काही ठिकाणी ढगांची दाटी पाहणेच नशिबी आले. खरिपाचा हंगाम सुरू झाला. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस अद्याप विकला न गेल्याने त्यांची अवस्था सध्या 'घर का न घाट का' अशी दोलायमान झाली आहे.

ऑनलाइन नोंदणीच्या 30 मे या तारखेपर्यंत 557 पैकी 524 जणांनी नोंदणी केली. जवळपास 40 जणांची नोंदणीच होऊ शकली नाही. शेवटी खासगी जिनिंगकडून सरकारने हमीभावात खरेदी सुरू केली. त्यातील 296 शेतकऱ्यांचा 8190.90 क्विंटल कापूस सरकारकडून खरेदी करण्यात आला असून (नोंदणी न झालेले) शेतकऱ्यांचा सहा हजार क्विंटल कापूस शिल्लक आहे. जूनपर्यंत सर्व कापूस खरेदी करण्यात येईल, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले असले तरी आता पेरणीची वेळ आहे. बॅंकांनी पीककर्ज देण्यास हात आखडता घेतल्याने शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारी जाण्याची मोठी शक्‍यता आहे.

नागपूरच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

रामटेक तालुका धानउत्पादक म्हणून ओळखला जातो. धानपिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 14,706 हेक्‍टर असून, तब्बल 6,000 पेक्षा अधिकचे क्षेत्र लागवडीखाली येण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कापसाच्या लागवड क्षेत्रातही वाढ होण्याची शक्‍यता आहे. तुरीच्या लागवड क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे सांगितले जाते. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जाते. याशिवाय मिरची, भाजीपाला यांच्याही लागवड क्षेत्रात वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

बरेच शेतकरी लागवडीला मुकले
सिंचनाच्या उपलब्धतेवरून तालुक्‍याचे उत्तरपूर्व व दक्षिण पश्‍चिम असे सरळ दोन भाग पडतात. यापैकी दक्षिण-पश्‍चिम भाग पेंच प्रकल्पाच्या कालव्यामुळे भंडारा जिल्ह्यापर्यंत हमखास सिंचनाखाली असलेला भाग मानला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तोतलाडोह धरणाच्या वरील भागात मध्य प्रदेश सरकारने चौराई हे पेंच नदीवर धरण बांधल्याने तोतलाडोह धरणात येणारे पाणी अडवले जाते. त्यामुळे मागील वर्षी बरेच शेतकरी लागवड करू शकले नव्हते.

अवश्य वाचा : कोरोना ब्रेकिंग : नागपूर लवकरच गाठणार हजारचा पल्ला; बाधितांची संख्या पोहोचली 960वर

निसर्गाच्या लहरीपणाचा बसतो फटका
नंतरच्या काळात मध्य प्रदेशात चांगला पाऊस पडल्याने चौराई धरणातून तोतलाडोह धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे यंदा या भागात चांगले उत्पादन होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. तालुक्‍याच्या उत्तर-पूर्व भागात शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांना बसतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer has double problem in monsoon