
दलाल, व्यापारी, प्रशासक यांची मिली भगत असल्यामुळे शेतकऱ्यांना बरोबर भाव मिळत नाही. त्यांची हुकुमशाही चालत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
मौदा (जि. नागपूर) : तालुक्यात मिरची हे महत्त्वाचे पीक आहे. ते शेतकऱ्यांसाठी उत्पनाचे चांगले स्त्रोत आहे. मात्र, शेतकऱ्यांना अर्ध्या रात्री मिरचीचे दर माहिती होतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. यात दलाल व कृषी उत्त्पन्न बाजार समितीमुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कृषी उत्त्पन्न बाजार समिती समोर आंदोलन केले. शेतकऱ्यांना मिरचीचा भाव सकाळी आठ वाजता कळवा, जेणेकरून शेतकरी त्याप्रमाणे मजुरांची रोजी ठरवतील, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
कधी मध्यरात्री तर कधी दुसऱ्या दिवशी मिरचीचे भाव शेतकऱ्यांना माहिती होतात. त्यामुळे मिरची व इतर माल काय भावाने विकला जातो, हे शेतकऱ्यांनाच माहिती होत नाही. पूर्वी सायंकाळी जागेवर बोली होत होती. किंमत पटली तर शेतकरी माल देत होते, अन्यथा नाही. पण आता शेतकऱ्याला मिरचीचा भाव माहित होत नसल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आला आहे.
दलाल, व्यापारी, प्रशासक यांची मिली भगत असल्यामुळे शेतकऱ्यांना बरोबर भाव मिळत नाही. त्यांची हुकुमशाही चालत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
आंदोलनाचे वेळी शेतकऱ्यांनी आपली मागणी लाऊन धरली. कृषी उत्त्पन्न बाजार समिती समोर सकाळपासून आंदोलन सुरू केले. सकाळी आठ वाजता शेतकऱ्यांना मिरचीचे दर कळवावे व कृषी उत्पन्न बाजार समितीने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
दलाल शेतकऱ्यांची पिळवणूक करतात
आदल्याच दिवशी मिरचीचा दर दलालांना माहित असतो. त्यांनी दुसऱ्या दिवसाचा दर ठरवून शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे. शेतकऱ्यांना परवडेल तर माल देतील नाहीतर नाही देणार. परंतु, हे दलाल एकत्र येऊन भाव ठरवित नाही व शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. दलालांना मिरची घेणे परवडत नसेल तर त्यांनी माल घेणे बंद करावे. शेतकऱ्यांनी माल केंद्रात नेऊन माल विकावा, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.
- तापेश्वर वैद्य,
पशु संवर्धन सभापती, जिल्हा परिषद, नागपूर
संपादन - नीलेश डाखोरे