बळीराजाला बसतोय डिझेल दरवाढीचा फटका; मशागतीचा वाढला खर्च; खर्चाचा ताळमेळ जुळेना 

राजेश रामपूरकर 
Tuesday, 23 February 2021

खर्च व शेतमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात असल्याचे बोलले जात आहे. 

नागपूर ः डिझेलच्या भावात सतत वाढ होत असल्याने सर्वच क्षेत्रांना फटका बसू लागला आहे. शेती व्यवसायही प्रभावित झाला आहे. ग्रामीण भागात मनुष्यबळ मिळत नसल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक कामे कली जातात. डिझेलच्या वाढत्या दरामुळे मशागतीच्या खर्चात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. खर्च व शेतमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा - अजब प्रेम की गजब कहानी! फेसबुक प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीला भेटण्यासाठी त्यानं केलं धकाकदायक...

गेल्या दशकापासून शेतीत आमूलाग्र बदल झाले. चार दिवसांची कामे एक तासात व्हायला लागली. एक पीक काढले की अवघ्या एक दिवसात मशागत करून दुसरे पीक उभे राहील, अशी साधने निर्माण झाली. नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटा फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली. आता मात्र डिझेलचे भाव वाढू लागल्याने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर भाड्याने देणाऱ्यांनी दर वाढविले आहेत. 

मशागतीचे दर वाढल्याने आणि शेतीचे उत्पादन आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. काळानुरूप बैलांच्या मदतीने शेती करणेही आज तरी शक्य नाही. पूर्वी नांगरणीसाठी १६०० रुपये आकारले जात होते. त्यात आता ४०० रुपयांची वाढ झाली आहे. रोटा मारण्यासाठी पूर्वी १२०० रुपये आकारले जात होते. त्यात ३०० रुपयांची वाढ झाली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

शेती मशागतीचे दर असे (प्रति एकर) 

प्रकार : डिझेल दर वाढीपूर्वी - वाढीनंतर 
नांगरणी - १६०० रुपये - दोन हजार रुपये 
रोटा मारणे - १२०० रुपये : १५०० रुपये 

हेही वाचा - सुखी संसाराचा करूण अंत; मैत्रिणीच्या लग्नास जाण्यास पतीनं केला विरोध अन् नवविवाहितेनं...

शेतात काम करण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही. धावपळीच्या युगात शेतीची कामे लवकर व्हावी यासाठी ट्रॅक्टरला अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. परंतु, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मशागतीचेही दर वाढले आहेत. शेतीचे उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 
-राजीव मेंघरे, 
शेतकरी

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are in loss due to rate hikes of Diesel in Nagpur