शेतकऱ्यांनी कापसाची फरदड घेऊ नये; गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळा, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

निलेश डोये
Friday, 15 January 2021

डिसेंबर-जानेवारी दरम्यान कापसाचे पीक पूर्णपणे काढून टाकावे. नंतर खोडवा (फरदड) घेऊ नये. यामुळे गुलाबी बोंड अळीची शृंखला तुटण्यास मदत होते.

नागपूर : शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी शेतात‍ असलेले कापसाचे पीक काढून टाकावे. तसेच शेतात असलेल्या कापसाची फरदड घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिसेंबर-जानेवारी दरम्यान कापसाचे पीक पूर्णपणे काढून टाकावे. नंतर खोडवा (फरदड) घेऊ नये. यामुळे गुलाबी बोंड अळीची शृंखला तुटण्यास मदत होते. कापूस वेचणी झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी पऱ्हाट्या आणि इतर पाला-पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेल्या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार किटकनाशकांची फवारणी करावी. फवारणी करताना किटकनाशकांसोबत दिलेली माहिती वाचून खबरदारीच्या सूचनांचे पालन करावे. फवारणी करताना संरक्षक पोशाख, बुट, हातमोजे, मास्क इत्यादींचा वापर करणे बंधनकारक असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : हृदयद्रावक! खेळता-खेळता स्वयंपाकघरात पोहोचली, आई गंSSS ओरडली अन् सोडला जीव

हरभरा घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

नागपूर विभागात सोयाबीन पीक घेतल्यानंतर हरभरा पिकांखालील क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे हरभरा पीक उत्पादक शेतकऱ्यांनी पिकांवर घाटेअळींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सुरुवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्काने फवारणी करावी. तसेच हरभऱ्याच्या शेतात पक्षी थांबू शकतील असे थांबे उभारावेत, जेणेकरुन पिकावरील घाटेअळी नष्ट करण्यास आणि पक्ष्यांना अन्न मिळण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर घाटेअळीचे प्रमाण वाढल्यास फ्लूबेंडामाइड, क्विनॉलफॉस, टायझोफॉस, डेल्टामेथ्रीनची दोन वेळा फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers need to make proper management to prevent the outbreak of pink bond larvae on the upcoming season cotton crop