खरीप गेला, आता रब्बीसाठी पैसा आणणार कुठून; शेतकरी पाहतोय नुकसान भरपाईची वाट

विजयकुमार राऊत
Monday, 26 October 2020

नरखेड व काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे या वर्षातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या पिकांचे सततच्या पावसामुळे व विविध नवीन रोगांमुळे अतोनात नुकसान झाले. तसेच संत्रा व मोसंबी फळपिकांचे देखील अंबिया बहार गळाल्याने व मृग बहार बहरलाच नसल्यामुळे नुकसान झाले आहे.

जलालखेडा (जि. नागपूर): आधीच कोरोनाचा मार सहन करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे वर्ष धोक्याचेच आहे. यावर्षी खरीप हंगाम त्याच्या हातून केल्यामुळे रब्बी हंगाम कसण्यासाठी निधी कुठून उभा करावा? असा प्रश्न पडला आहे. नरखेड तालुक्यातील महत्वाचे पिक म्हणजे कापूस, सोयाबीन, संत्रा व मोसंबी हे आहे. या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. तरीपण सर्वेक्षणात कापूस नसल्यामुळे आधीच बऱ्याच शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ज्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला आहे, त्या पिकांची नुकसानभरपाई अनुदानाची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. 

नरखेड व काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे या वर्षातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या पिकांचे सततच्या पावसामुळे व विविध नवीन रोगांमुळे अतोनात नुकसान झाले. तसेच संत्रा व मोसंबी फळपिकांचे देखील अंबिया बहार गळाल्याने व मृग बहार बहरलाच नसल्यामुळे नुकसान झाले आहे. नरखेड तालुक्यात १५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. या पिकाचे ऑगस्टमध्ये आलेल्या सततच्या पावसामुळे व येलो मोझाक किडीमुळे १०० टक्के नुकसान झाले आहे. पिकांची कापणी करून काढणी नुकसानाची ठरत असल्यामुळे शेतकरी पिकावरच रोटावेटर चालवित आहे. कापूस पिकावर आलेल्या मर रोगांमुळे व अति पावसामुळे कापसाची बोंडे सडत आहे. तसेच पावसामुळे फुटलेला कापूस देखील ओला झाला असून तो अव्वाच्या सव्वा भावात विकावा लागत आहे. यामुळे आता कापसाच्या उत्पादनात देखील कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - `दीक्षा`तून घरोघरी पोहोचतो बाबासाहेबांचा विचार;...

नरखेड तालुक्यात १५ हजार हेक्टरवर संत्रा, तर ६ हजार हेक्टरवर मोसंबीचे पिक घेतले जाते. मृगात पडलेल्या पावसाच्या अनियमितपणामुळे मृग बहार बहरलाच नाही तर असलेला आंबिया बहराची मोठ्या प्रमाणात बुरशीमुळे गळती झाली. फळे गळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबी अल्प भावात विकून टाकली. संत्र्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 
मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिक विमा काढला होता. नुकसानीनंतर तक्रार करण्यात आली. त्यानंतर काहींच्या पिकांचे सर्वेक्षण झाले, तर काहींचे झालेच नाही. किती शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली हा देखील संशोधनाचा विषय आहे. विमा कंपनीवर शासनाचे वर्चस्व नसल्यामुळे ते शासनाच्या सूचना देखील ऐकत नाही. शेतकऱ्यांनी संपर्क केल्यानंतर त्यांची ही कैफियत कोणी ऐकत नाही. जिल्हा स्तरावर कंपनीचे कार्यालय हे नावापुरतेच आहे. कंपनीचा सर्व कारभार हा मुंबई व पुणे येथे असलेल्या मुख्यालयातूनच चालतो. तालुकास्तरावर प्रतिनिधी नाही, अशात ते कृषी विभागाचे देखील ऐकत नाही. 

शासनाकडून नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या आदेशानंतर महसूल, कृषी व पंचायत विभागाकडून संयुक्त सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात सुद्धा आला आहे. यामुळे आता नेत्यांनी दौरे बंद करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर व जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - बिना येथील झुणका भाकरीला कोणी वालीच नाही; कोरोनामुळे मंदिर क्षेत्रातील दुकानदारांना फटका 

नुकसानीची माहिती शासनाकडे पोहोचली आहे. यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी निधीची तरतूद करावी, जेणेकरून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्राप्त होऊ शकेल. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती ही अतिशय भीषण आहे. खरीप हंगामातील पिक विक्रीसाठी नसल्यामुळे त्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी हे सण सुद्धा अंधारात जाणार आहे. लोकप्रनिधींनी वास्तव मुख्यमंत्र्यांना सांगावे व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहकार्य करावे. 
-वसंत चांडक, माजी सभापती, नरखेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers waiting for compensation of crop damaged in jalalkheda of nagpur