बिना येथील झुणका भाकरीला कोणी वालीच नाही; कोरोनामुळे मंदिर क्षेत्रातील दुकानदारांना फटका 

दिलीप गजभिये
Friday, 23 October 2020

यंदा कन्हान, कोलार, पेंच या त्रिवेणी नद्यांच्या महापुरामुळे आणि कोव्हिडमुळे येथे अस्थीविसर्जन बंद होते. नुकतेच काही दिवसांपासुन अस्थी विसर्जन सुरू करण्यात आले.

खापरखेडा (जि. नागपूर)  : राज्यात कोरोनाने थैमान घातले असून संपूर्ण महाराष्ट्रात मंदिर, देवालयाचे दरवाजे सरकारने मागील सहा महिन्यांपासून बंद केले. ज्यामुळे कुठल्याही नामांकित मंदिर क्षेत्रातील दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसला. बिना संगम येथील प्राचीन भोसलेकालिन शिव मंदिरातही भक्तांची ये-जा नाही. 

यंदा कन्हान, कोलार, पेंच या त्रिवेणी नद्यांच्या महापुरामुळे आणि कोव्हिडमुळे येथे अस्थीविसर्जन बंद होते. नुकतेच काही दिवसांपासुन अस्थी विसर्जन सुरू करण्यात आले. कोव्हिड-१९ मुळे मंदिरात भक्तगण येणे बंद झाल्याने मंदिर क्षेत्र परिसरातील दुकानदारांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. 

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

कन्हान, कोलार, पेंच या तीन नद्यांच्या संगम काठावर प्राचीन भोसलेकालिन शिवमंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. हे मंदिर भोसले घराण्याचे खासगी मंदिर असून त्रिवेणी नद्यांचा संगम अस्थीविसर्जनासाठी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात प्रख्यात आहे. शिवाय भोसलेकालिन शिव मंदीराला शासनाने पर्यटनस्थळ"क" दर्जा सुद्धा दिला आहे.

मंदिरात दोन नंदी असून मोठा नंदी राजाचा तर लहान नंदी राणीचा अशी प्राचीन मान्यता असल्याचे कळते. मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असत, मात्र कोरोनाच्या महामारीने मंदिरात येणा-या भावनिक भक्तावर ब्रेक लागला आहे. कोरोनाकाळापुर्वी हजारो भाविक रोज येत होते परिसर विविध दुकानांनी व भक्तांनी गजबजून जात होता. 

झुणका भाकर प्रसिद्ध

सद्यास्थितीत मंदिर सुरू असले तरी भक्तांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे दुकानदारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. बिना संगम येथील झुणका भाकर प्रसिद्ध आहे. मात्र सध्या झुणका भाकरीलाही कोणी वाली नाही.

जाणून घ्या - अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ

मंदीरे लवकरात लवकर खुली करावीत

अनेक वर्षापासून मंदिरात देवाच्या सेवेत आहे. मंदिराला भक्तांची प्रतीक्षा आहे. मंदिर पुरातन काळातील असून यंदा पावसाळ्यात मंदिराला महापुराने वेढलेले होते. देवाने कसेबसे वाचविले. सर्व दुकाने वाहून गेली. एकीकडे कोरोनामुळे दहशतीने मंदीरात भक्त कमी जातं आहे. महाराष्ट्रात अनेक मोठमोठे मंदिरे देवालये बंद आहेत. शासनाने मंदीरे लवकरात लवकर खुली करावीत, अशी शिवदत्त पुजारी यांची विनंती आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No customers at zunka bhakar kendra at Bina sangam in nagpujr