दुर्दैवी... शेती हडपण्यासाठी सावकाराकडून शेतकऱ्याच्या पत्नीला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

फिर्यादीने 2017 मध्ये आजारपण व शेतीच्या कामासाठी आरोपी अभय पाटील याच्याकडून दोन लाख रुपये उधार घेतले होते. याकरिता सहा महिन्यात तीन टक्‍के व्याज आकारण्यात येईल व त्याकरिता शेतीचे दस्तावेज तारण म्हणून ठेवले. 

नागपूर : व्याजाने दिलेल्या पैशाच्या बदल्यात एका सावकारने शेती हडपण्याचा प्रयत्न केला असून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीची साडी खेचून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सावकार व त्याच्या पत्नीविरुद्ध मारहाण करणे, विनयभंग करणे आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

अभय पाटील आणि प्राजक्ता पाटील रा. उमरेड अशी आरोपींची नावे आहेत. शेषराव हेमराज चौधरी (35) रा. मालेवाडा, भिवापूर असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादीने 2017 मध्ये आजारपण व शेतीच्या कामासाठी आरोपी अभय पाटील याच्याकडून दोन लाख रुपये उधार घेतले होते. याकरिता सहा महिन्यात तीन टक्‍के व्याज आकारण्यात येईल व त्याकरिता शेतीचे दस्तावेज तारण म्हणून ठेवले. 

हेही वाचा - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत

सहा महिन्यात पैसे परत करण्यासाठी गेले असता आरोपी त्या शेतीचे बनावट विक्रीपत्र तयार करून आपल्या नावाने केली. पैसे स्वीकारण्यास नकार देऊन शेतीवर मालकी करू लागले. आज बुधवारी शेषराव यांची पत्नी शेतीवर काम करीत असताना दुपारी 1 वाजता आरोपी दाम्पत्य शेतीवर पोहोचले व त्यांनी शेतीतून त्यांच्या पत्नीला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीची साडी खेचून मारहाण केली. या प्रकरणी शेषराव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 

सावकारास अटक : गृहमंत्री अनिल देशमुख

 महिलेला बेअब्रु करणाऱ्या सावकाराच्या विरोधात भिवापूर पोलीस ठाण्यात विनयभंग, फसवणूक व महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अभय पाटील व त्याची पत्नी प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's wife beaten by moneylender

टॉपिकस