वय आठ वर्ष आणि यकृत झाले निकामी; वडिलांची तयारी अन् बारा तासांची यशस्वी शस्त्रक्रिया

केवल जीवनतारे
Tuesday, 3 November 2020

नागपुरात राहणारे योगेश शंभरकर यांची मुलगी ठणठणीत होती. अचानक यकृताचा आजार झाल्याने प्रकृती बिघडली. वजन कमी होऊ लागले. इतर आजाराचा संसर्ग होण्यापूर्वीच यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यकृत कायमचे खराब झाले.

नागपूर : कुठलंही संकट असो, आई-वडील आपल्या मुलांना संकटाची झळ लागू देत नाही. मुलांसाठी आयुष्य वेचणारे आई-बाबा त्यांच्यासाठी तारणहार ठरतात. अशाच एका वडिलांनी यकृत निकामी झालेल्या आठ वर्षांच्या चिमुकलीला यकृत दान करून प्राण वाचवले. उपराजधानीतील ग्रीष्मा योगेश शंभरकर या चिमुकलीवर १२ तासांची यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष असे की, नागपुरात लॉकडाऊनमुळे थांबलेले अवयव प्रत्यारोपण पुन्हा सुरू झाले आहे.

वैद्यकीय चाचण्यांमध्ये ग्रीष्माला यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी क्षणाचाही विचार न करता वडील योगेश यांनी आपल्या यकृताचा काही भाग देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर अवयव प्रत्यारोपण समितीकडे परवानगीसाठी हे प्रकरण पाठवण्यात आले. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे, मेडिकल अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या समितीने परवानगी दिली. त्यानंतर आर्थिक जुळवाजुळव करून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

जाणून घ्या - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

नागपुरात राहणारे योगेश शंभरकर यांची मुलगी ठणठणीत होती. अचानक यकृताचा आजार झाल्याने प्रकृती बिघडली. वजन कमी होऊ लागले. इतर आजाराचा संसर्ग होण्यापूर्वीच यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यकृत कायमचे खराब झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये ही बाब लक्षात घेत आठ दिवसांपूर्वी ग्रीष्मावर १२ तासांची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात येईल.

अत्यंत छोटा भाग केला विलग

आम्ही ग्रीष्माचे वडील योगेश शंभरकर यांच्या यकृताचा अत्यंत छोटा भाग विलग केला. त्याचं वजन काही ग्रॅम होतं. तेवढा भागसुद्धा चिमुकलीसाठी पुरेसा होता. एक विशिष्ट तंत्र वापरून आम्ही ते यकृत ग्रीष्माच्या शरीरात प्रत्यारोपित केले. अत्यंत लहान रक्तवाहिन्यांना असल्याने जोडताना कमालीची सजगता जपली. शस्त्रक्रियेनंतर ग्रीष्माला स्थिर तसेच नाजूक अवस्थेत अतिदक्षता विभागात ठेवले आहे. ग्रीष्मा आणि वडिलांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांनी सांगितले.

हेही वाचा - 'जय-विरू'चं अनोख प्रेम! एक बैल हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पितो

शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची
ग्रीष्माची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. आठ वर्षांच्या चिमुकलीवर अवयव प्रत्यारोपण आव्हान होते. सध्या ग्रीष्मा आणि वडिलांची प्रकृती बरी आहे. न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये लॉकडाउनंतर हे पहिले अवयवदान आहे. अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभा दाणी यांच्यासह समिती सदस्यांचे मोलाची मदत केली.
- डॉ. आनंद संचेती,
संचालक, न्यू ईरा नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The father saved the girl life by donating a liver