बापरे! मानकापूर उड्डाणपुलावर ५० मीटरचे भगदाड; सहा वर्षांतच बांधकामाचा दर्जा उघड

राजेश प्रायकर
Tuesday, 1 December 2020

नागपूर : मानकापूर येथे सहा वर्षांपूर्वी नागपूरकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ५० मीटर लांब भागाला भगदाड पडल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा वर्षांमध्येच या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जाचे पितळ उघड पडले आहे. 

नागपूर : मानकापूर येथे सहा वर्षांपूर्वी नागपूरकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ५० मीटर लांब भागाला भगदाड पडल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा वर्षांमध्येच या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जाचे पितळ उघड पडले आहे. 

सहा वर्षांपासून नागपूरकर कुठल्याही भीतीशिवाय मानकापूर उड्डाणपुलावरून ये-जा करीत आहे. मात्र, या पुलावरील वाहतुकीचा पाया किती मजबूत आहे, याची प्रचिती पुलाच्या परीक्षणानंतर आली. दरवर्षी करण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या परीक्षणात ५० मीटर लांबीचा भाग कमकुवत असल्याचे पुढे आल्याचे कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यानेच मान्य केले. पुढील शंभर वर्षांसाठी हा उड्डाणपूल तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सहा वर्षांतच या पुलाच्या कामाचा दर्जा स्पष्ट झाला.

हेही वाचा - बाबांचे समाधीस्थळ असलेल्या स्मृतीवनात डॉ. शीतल आमटेंचा दफनविधी, रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार 

नागपूरकडून कोराडीकडे जाताना डाव्या बाजूने मानकापूल नाल्यावरील उड्डाणपुलाच्या दोन महिन्यापूर्वी परीक्षणानंतर यात सुधारणांची गरज व्यक्त करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून या पुलावरून असंख्य नागरिक बिनधास्तपणे वाहनाने ये-जा करीत होते. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परीक्षणानंतर दुरुस्तीसंबंधी कंत्राटदार कंपनी ओरिएंटलला निर्देश दिले. या कंपनीने गेल्या १० नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. उड्डाणपुलाचे २५-२५ मीटरचे दोन स्पॅम धोक्यात होते.

उड्डाणपुलावरील ५० मीटरचा हा भाग पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आला असून मोठे भगदाड तयार झाले आहे. जुन्या बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळाखींचा सांगाडा दिसून येत आहे. एवढेच नव्हे या साखळीच्या सांगाड्यातून पुलाखालील दृश्यही सहज बघता येते. सहा वर्षांतच दुरुस्तीची गरज पडल्याने २०१४ मध्ये कंत्राटदार कंपनीने केलेल्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्न निर्माण झाले आहे.

सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची

कंत्राटदार कंपनीने दुरुस्तीचे काम सुरू केले असून जानेवारीपर्यंत उड्डाणपुलाच्या एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली असून दुसऱ्या बाजूने वाहतूक वळविण्यात आली. उड्डाणपुलाच्या अरुंद मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने अपघाताचीही शक्यता बळावली आहे. 

एकाच बाजूने दोन्हीकडील वाहतूक धोकादायक

दुरुस्तीची कामे जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पुलाच्या एकाच बाजूने दोन्हीकडील वाहतूक सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असून रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. एका बाजूने अरुंद रस्त्यावरून दोन्हीकडील वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. उड्डाणपुलाखालील मार्गावरून वाहतूक वळविण्याचा पर्याय असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

क्लिक करा - War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय सांगायचे होते 'बाबां'च्या नातीला?

गडकरींनी टोचले होते कान

या उड्डाणपुलाच्या पुढे गेल्यास आरयूबी तयार करण्यात आला आहे. २०१४ मध्ये या आरयूबीचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. निर्मितीच्या वेळीच रुंद रस्ते, पिलर्ससाठी अभियांत्रिकी संरचना अचूक असणे आवश्यक असल्याचे नमूद करीत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कान टोचले होते. 

शंभर वर्षांपर्यंत पूल टिकावा यासाठी नव्याने काम
दोन महिन्यांपूर्वी परीक्षण करण्यात आले होते. यात वाहतुकीची वर्दळ बघता ५० मीटरचा भाग कमकुवत असून त्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. देखभाल, दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी कंपनीकडे आहे. कंपनी या कामासाठी पैसा घेणार नाही. शंभर वर्षांपर्यंत पूल टिकावा, यासाठी नव्याने काम करण्यात येत आहे. 
- विकास सिंग,
वरिष्ठ सहायक महाव्यवस्थापक, ओरिएंटल स्ट्रक्चरल

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty meter pit on Mankapur flyover