
शीतल आमटे आपल्या मागे एक बारा वर्षांचा मुलगा आणि पती गौतम करजगी यांना सोडून गेल्या आहेत. या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रचंड गोपनीयता बाळगली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. सुसाईड नोट असल्याची चर्चा आहे. परंतु, याला पोलिसांनी वृत्त लिहिस्तोवर दुजोरा दिलेला नाही.
चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या, आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी (वय ३९) यांनी सोमवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. दुसरीकडे रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कर्मयोगी बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांचे समाधीस्थळ असलेल्या स्मृतिवनात डॉ. शीतल आमटे यांना दफन केले जाणार आहे. त्या आपल्या मागे एक बारा वर्षांचा मुलगा आणि पती गौतम करजगी यांना सोडून गेल्या आहेत. या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रचंड गोपनीयता बाळगली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. सुसाईड नोट असल्याची चर्चा आहे. परंतु, याला पोलिसांनी वृत्त लिहिस्तोवर दुजोरा दिलेला नाही.
हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
आनंदवनात आमटे कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. येथेच डॉ. शीतल आमटे-करजगी राहतात. महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या काम बघत होत्या. आज नेहमीप्रमाणे डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी दुपारी ११.३० वाजताच्या सुमाराला आपल्या कार्यालयातून परत आले. तेव्हा डॉ. शीतलच्या खोलीचे दार बंद असल्याचे लक्षात आले. बराच आवाज देऊनही ते उघडले नाही. शेवटी आनंदवनातील कर्मचाऱ्यांनी द्वार तोडले असता डॉ. शीतल अत्यव्यस्त अवस्थेत खाटेवर पडलेल्या दिसल्या. त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आपल्या निवासस्थानी हाताला विषारी इंजेक्शन टोचल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ....
त्यांच्या निधनाच्या बातमीने राज्यभरातील सामाजिक वर्तुळाला हादरा बसला. हायफ्रोफाईल प्रकरण असल्याने चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात चार डॉक्टरांच्या उपस्थिती शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या उपस्थितीत आनंदवनात पंचनामा झाला. डॉ. शीतल आमटे यांचा भ्रमणध्वनी आणि काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबची चमू आली होती. यात तीन सदस्यांचा समावेश होता.
हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही...
प्रकरणाला वादाची किनार?
काही दिवसांपूर्वीच शीतल आमटे- करजगी यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. मात्र, काही तासांतच ही चित्रफीत माध्यमातून हटवण्यात आली होती. दरम्यान, डॉ. शीतल यांनी केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले होते. या निवेदनात डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. डॉ. शीतल यांनीही समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.
हेही वाचा - ‘ई सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाल्या होत्या डॉ. शीतल आमटे, वाचा सविस्तर...
आई-वडील नसताना मृत्यूला कवटाळले -
डॉ. शीतल यांचे वडील डॉ. विकास आमटे आणि आई डॉ. भारती आमटे हे घटनेच्या वेळी आनंदवनात नव्हते. ते काही कार्यक्रमानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्रकल्पात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीतच डॉ. शीतल यांनी मृत्यूला कवटाळले.