नागपूर ब्रेकिंग : आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, संख्या 17 वर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

उपराजधानीत 8 जून रोजी बाधितांचा आकडा 718 वर होता. मात्र आठ दिवसनंतर 15 जूनपर्यंत 325 बाधितांची वाढ झाली. कोरोनाबाधिता प्रादुर्भाव उपराजधानीसाठी डोकेदुखी ठरत असतानाच मृत्युसत्रही सुरूच आहे.

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रकोप उपराजधानीत गुणाकार पद्धतीने वाढत आहे. झोपडपट्टयांमध्ये कोरोना शिरला आहे. त्यातच कोरोनामुळे होणारे मृत्यू हळूहळू वाढत आहेत. शुक्रवार, 12 जूनला कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर लगेच तीन दिवसानंतर सोमवारी (ता.15) आणखी एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा कोरोनाच्या बाधेने सकाळी मृत्यू झाला. यामुळे प्रशासन हादरले. नागपुरातील मृत्युसंख्या 17 वर पोहोचली. तर 36 जण नवीन कोरोनाबाधित आढळले असून, बाधितांचा आकडा 1041 वर पोहोचला. मध्य प्रदेशातील कोरोनाबाधितांचा नागपुरात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. तर आतापर्यंत मेडिकलमध्ये 9 तर मेयोत आठ मृत्यू झाले. 

उपराजधानीत 8 जून रोजी बाधितांचा आकडा 718 वर होता. मात्र आठ दिवसनंतर 15 जूनपर्यंत 325 बाधितांची वाढ झाली. कोरोनाबाधिता प्रादुर्भाव उपराजधानीसाठी डोकेदुखी ठरत असतानाच मृत्युसत्रही सुरूच आहे. सोमवारी सकाळी मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलमध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 50 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरात मृतांचा आकडा 17 वर गेला. 8 जून रोजी या व्यक्तीला मेडिकलमध्ये श्‍वसनाच्या आजारासाठी दाखल केले होते. 

यावेळी पंधरा दिवसांपासून त्याला खोकला असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. निदानातून न्यूमोनियाचे निदान झाले. सोबतच फुप्फुसामध्येही संसर्ग असून हृदयाचाही त्रास होता. प्रकृती गंभीर होताच त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर 15 जून रोजी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील कोरोनाबाधिताचा नागपूरच्या मेडिकलमध्ये झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी 4 जून रोजी 62 वर्षीय महिलेचा कोरोनाच्या बाधेने नागपुरात मृत्यू झाला होता. 

हेही वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...
 

मेयो, मेडिकल एम्समध्ये 361 रुग्ण 

दररोज दोन आकड्यातील रुग्णसंख्या आढळून येत असल्याने प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी आढळून आलेले सर्व कोरोनाबाधित पाचपावली व रविभवन विलगीकरणातील आहेत. शहरातील वस्त्यांमध्ये हळूहळू कोरोना पाय पसरत आहे. यामुळे शहरात आता धोका वाढला आहे. तर प्रशासनाची चिंताही वाढली आहे. नाईक तलाव, चंद्रमणीनगर, हुडकेश्‍वर रोड सावरबांधे सभागृहाजवळील रुग्ण आहेत. विशेष असे की, रामेश्‍वरी परिसरातील धाडीवाल ले-आउट, आर्यनगर आणि नरसाळा कोरोनाच्या नकाशावर आले. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. सध्या मेडिकल, मेयो आणि एम्समध्ये 361 बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

शहरातील हॉटस्पॉट 

  • मोमिनपुरा -247 
  • नाईकतलाव-बांगलादेश-229 
  • सतरंजीपुरा -120 
  • टिमकी-भानखेडा-53 
  • शांतीनगर -22 
  • हंसापुरी -18 

 

शहरात 33 जण कोरोनामुक्त

 
कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूचा आकड्यातही वाढ होत आहे. त्याच तुलनेत बरे होणाऱ्यांचा टक्का गतीने वाढत आहे. एम्समधून नाईक तलाव परिसरातील 16, गुमगाव आणि लोकमान्यनगरातील प्रत्येकी एक अशा 18 व्यक्तींसहित मेयोतून 5 आणि मेडिकलमधून 10 असे एकूण 33 जण कोरोनामुक्त करण्यात आले. आतापर्यंत 640 जणांनी कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्ध जिंकले आहे. यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. ते ठणठणीत बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. 

 

17 पैकी 5 मृत्यू बाहेरचे

 
नागपूर शहरातील मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत 17 मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे झालेले 12 मृत्यू हे शहरातील आहेत. तर उर्वरित पाच मृत्यू हे अमरावती, अकोला, मध्य प्रदेशातील आहेत. आहेत. शहरात 5 एप्रिल रोजी पहिला मृत्यू सतरंजीपुरा झोनमध्ये झाला होता. आतापर्यंत सतरंजीपुरा येथील 2 मोमिनपुरा येथील 3 मृत्यू झाले. याशिवाय 5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाच्या मृत्यूसहित 11 मे रोजी पांढराबोडी आणि 16 मे रोजी गड्डीगोदाम, 17 मे रोजी शांतीनगर, 31 मे रोजी भिक्षेकऱ्यासहित हिंगण्यातील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यानंतर 8 जूनला हंसापुरीतील एक मृत्यू वगळता इतर सर्व मृत्यू हे बाहेरचे आहेत. अमरावती येथील दोन, मध्य प्रदेशातील 2 तसेच अकोल्यातील एक असे मृत्यू नागपुरात झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty-year-old man dies of corona in Nagpur