आयुक्तांनी पोलिसांनाही द्यावे वागणुकीचे धडे; सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांची दहशत : आमदार कृष्णा खोपडे  

राजेश चरपे 
Thursday, 5 November 2020

तक्रारदारांना तासभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले जाते. धमक्या देणाऱ्यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना मोकळीक दिली जाते. तक्रारदारांनाच पुरावे आणण्यास सांगितले जाते.

नागपूर ः लोकप्रतिनिधींना कायद्याचे भान ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या पोलिस आयुक्तांनी लोकप्रतिनिधींसोबत पोलिस कर्मचाऱ्यांनाही कसे वागावे, काय करावे आणि करू नये याचे आधी धडे द्यावे अशी सूचना आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

भूखंडमाफिया आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र गल्लोगल्ली सुरू असलेली खायवाडी, क्रिकेट सट्टा, दारूची विक्री हे सर्व गैरव्यवहार कोणाच्या आशीर्वादाने चालतात. पोलिसांच्या डोळ्यादेखत उघडपणे अवैध धंदे करण्याची हिंमत कशी काय होते याचाही आयुक्तांनी बंदोबस्त करावा. 

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

तक्रारदारांना तासभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले जाते. धमक्या देणाऱ्यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना मोकळीक दिली जाते. तक्रारदारांनाच पुरावे आणण्यास सांगितले जाते. सेटलमेंट घडवून आणल्या जाते. याकडेही आयुक्तांनी आधी लक्ष देण्याची गरज आहे. प्रदीप पोहाने नगरसेवक या नात्याने जनतेची गाऱ्हाणे घेऊन राष्ट्रीय महामार्गच्या कार्यालयात गेले होते. 

सहा वर्षांपासून पुलाचे बांधकाम केले जात नसल्याने नागरिकांनी घोषणाबाजी केली. तेथे कोणी शिवीगाळ केली नाही किंवा तोडफोडही केली नाही. येथे उपस्थित अधिकारी लोकप्रतिनिधींसोबत उद्धट वागल्याने जनतेत रोष निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी अधिकाऱ्यांची बाजू घेतली. लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला याचा जाब आयुक्तांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना विचारावा.

अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज

पोलिस कोठडीत असलेल्या दोन मुलींना आपण भेटण्यासाठी गेलो होतो. पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांनी बेजबाबदार वागले. याची तक्रार आपण मोबाईलवरून दिली होती. त्यानंतर लेखी तक्रारसुद्धा केली. त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहनही खोपडे यांनी दिले. सर्वसामान्य नागरिक पोलिस ठाण्यात येण्यास भितात, पोलिस त्यांना मित्र वा मदत करणारा का वाटत नाही याचाही आयुक्तांनी विचार करावा, असेही खोपडे म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firstly cp have to teach behavior to police said krushna khopde