खूषखबर..! रेल्वेस्थानकांवर मिळणार खाद्य पदार्थ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

प्रवाशांची गरज लक्षात घेऊन सर्वच फुड स्टॉल सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी आरपीएफही सज्ज राहणार आहे.

नागपूर : देशभरात 1 जूनपासून मर्यादित स्वरूपात रेल्वेसेवा सुरू होत आहे. रेल्वेप्रवासादरम्यान खान्यापिण्याच्या वस्तू सहजतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी रेल्वे स्थानकांवरील स्टॉल सुरू करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉलही सोमवारपासून सुरू होतील. या स्टॉलवरून तयार आणि ताज्या पदार्थांची प्रवाशांना विक्री केली जाणार आहे. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

लॉकडाउनच्या काळात देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा थांबविण्यात आली. तेव्हापासूनच रेल्वेस्थानकांवरील स्टॉल बंद आहेत. अलिकडेच प्रवाशांना स्वगृही परतता यावे यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांसाठीही 30 राजधानी एक्‍स्प्रेसच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाड्या प्रवाशांना घेऊन धावत असल्या तरी स्टॉलमात्र बंदच होते. आयआरसीटीसीमार्फत खाण्यापीण्याची व्यवस्था करण्यात आली. सोमवारपासून तब्बल दोनशे गाड्या धावतील. रेल्वे प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना खान्यापिण्याच्या वस्तू सहजतेने मिळाव्या. भूक, तहानेने व्याकूळ होत प्रवास करण्याची वेळ येऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरील स्टॉल सुरू करण्याचे निर्देष देण्यात आले आहे. 

नागपूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी असून सर्वच नागपूर स्थानकावर थांबा घेतील. फलाट क्रमांक 1 ते 8 वरून ही सेवा संचालित होणार आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन सर्वच फुड स्टॉल सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी आरपीएफही सज्ज राहणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food will be available at railway stations