अनलॉकमध्ये कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मात्र मरेन, कोण म्हणालं असं...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

शहरातील प्रतापनगरसह सक्करदरा, सदर, मानेवाडा, पंचशील चौक, महाल, उदयनगर चौक, भांडेवाडी परिसर, ऑटोमोटिव्ह चौक, मानकापूर आदी परिसरात कामगारांचे ठिय्ये आहेत. या ठिय्यावर इतर राज्यांतील कामगार आपल्या राज्यात परत गेल्यामुळे फारशी गर्दी दिसत नसली, तरी येथे कामासाठी आलेल्यांनाच काम मिळत नसल्याचे चित्र आहे. या भागात कामगार सकाळीच एकत्र येतात. कामगार मिळण्यासाठी हे शहरातील हक्काचे ठिकाण असल्याने ज्यांना कामगार हवे आहेत, ती मंडळी येथे येऊन कामगार घेऊन जातात. येते अनेकांच्या हाताला काम मिळत असते. मात्र, सध्या कोरोनामुळे कामगारांचे हात रितेच आहेत. 

नागपूर :  "अनलॉक 1'नंतर राज्य शासनाने पुनश्‍च हरिओम म्हणत कामे सुरू झाल्याने बाजारात वर्दळ वाढली. मात्र, विटा, सिमेंट आणि रेतीचे भाव वाढल्याने बांधकाम क्षेत्राला अद्यापही वेग आलेला नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांना अद्यापही कामे मिळालेली नाहीत. हाताला काम नसल्याने कामगारांसह त्यांच्या परिवाराला उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आहे. 

जगभरात कोरोनाचा विळखा पडल्यानंतर देशभरात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. या सव्वादोन महिन्यांच्या टाळेबंदीत राज्य शासनाकडून धान्याचे वाटप नियमित होत होते. काही स्वयंसेवी संस्थांनीही तिखट, तेल, मीठ आणि इतरही साहित्यांचा पुरवठा करीत मदतीचा हात पुढे केला. टाळेबंदीमुळे काम करून आत्मसन्मानाने जगणाऱ्या कामगारांवर मदतीवर जगण्याची वेळ आली होती.

जाणून घ्या - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

मदत संपल्यानंतर अनेक कामगारांचे पोट भरण्यासाठी पुरते हालही झाले. टाळेबंदीचे ते दिवस संपल्यानंतर आता अनलॉकमध्ये काम मिळेल म्हणून गेल्या 12 दिवसांपासून दररोज प्रतापनगरातील कामगारांच्या ठिय्यावर येत आहे. मात्र, कामच नसल्याने आल्यापावली घरी जाण्याची स्थिती अनेकदा ओढवली. काम मिळेल त्यादिवशी कामावर जायचे, नाही तर आणलेला डब्बा तसाच परत घेऊन घरी जावे लागत आहे. त्यामुळे परिवाराचे पोट कसे भरायचे, यांची चिंता आहे. 

शहरातील प्रतापनगरसह सक्करदरा, सदर, मानेवाडा, पंचशील चौक, महाल, उदयनगर चौक, भांडेवाडी परिसर, ऑटोमोटिव्ह चौक, मानकापूर आदी परिसरात कामगारांचे ठिय्ये आहेत. या ठिय्यावर इतर राज्यांतील कामगार आपल्या राज्यात परत गेल्यामुळे फारशी गर्दी दिसत नसली, तरी येथे कामासाठी आलेल्यांनाच काम मिळत नसल्याचे चित्र आहे. या भागात कामगार सकाळीच एकत्र येतात. 

कामगार मिळण्यासाठी हे शहरातील हक्काचे ठिकाण असल्याने ज्यांना कामगार हवे आहेत, ती मंडळी येथे येऊन कामगार घेऊन जातात. येते अनेकांच्या हाताला काम मिळत असते. मात्र, सध्या कोरोनामुळे कामगारांचे हात रितेच आहेत. कोरोनाची टाळेबंदी काढल्यानंतर कामे सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना विटा, सिमेंट, लोखंड आणि रेतीच्या दरात विक्रमी वाढ झाली. आता पावसाळाही सुरू झाल्याने कामगारांचे वांधे झाले असल्याचे दिसू लागले आहे.

सविस्तर वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...

परिवाराचा गाडा कसा हाकायचा
एक मुलगा, आई-वडील आणि आम्ही दोघे, असा पाच जणांचा परिवार. काम नसल्याने आता परिवाराचा गाडा कसा हाकायचा, याची चिंता वाटू लागली आहे. त्यात भाड्याचे घर. काम नसल्याचे त्याचे भाडे कसे द्यायचे, हा मोठा प्रश्‍न आहे. टाळेबंदीच्या काळात रेशनकार्डवर धान्य मिळाले. काही स्वयंसेवी संस्थानी तेल, मीठ आणि तिखटही दिले. त्यातून परिवाराचे पोट भरले. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांकडे कामगारांना वाटण्यासाठी हजारो किट आल्या, त्या कामगारांना मिळाल्याच नाही. त्यांनीच आपली घरे भरलीत. 
दीपक कापसे, कामगार. 

 अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागले
दहा दिवसांपासून या ठिय्यावर नियमित येतो आहे. फक्त दोनच दिवस काम मिळाले. पूर्वी दररोज काम मिळत होते, आता कामच नसल्याने अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागले. कोरोनाने नव्हे, तर उपासमारीने मात्र मरेन, असे उद्विग्न होऊन ते बोलत होते. 
संजय वाघमारे, कामगार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Force to Sleep Without Food in Unlock