RSS चे जेष्ठ स्वयंसेवक आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचं निधन

टीम ई सकाळ
Saturday, 19 December 2020

माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख होते. संघाचे सह सरकार्यवाह श्री. मनमोहन वैद्य यांचे ते वडील होते. तसेच १९७८ साली ते विधानपरिषदेचे सदस्यही होते. 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जेष्ठ स्वयंसेवक आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचं आज दुपारी ३.३० वाजता वृद्धपकाळानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चाेत पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे.

माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख होते. संघाचे सह सरकार्यवाह श्री. मनमोहन वैद्य यांचे ते वडील होते. तसेच १९७८ साली ते विधानपरिषदेचे सदस्यही होते. 

जाणून घ्या - कल्पना सुचली अन् छतावर फुलविली पालेभाज्यांची बाग; घरीच मिळतो रसायनमुक्त भाजीपाला

पत्रकार मा.गो. वैद्य

१९६६ पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्‍या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले. आणीबाणीचा काळ व त्या वेळच्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग हा मा.गो. वैद्य याच्या संपादकीय कारकिर्दीतल्या कायम आठवणीत असणारा काळ होता.

आणीबाणीत सेन्सॉरशिप लागू झाल्यावर ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ हा त्यांचा अग्रलेख डाक आवृत्तीत छापला गेला; पण शहर आवृत्तीत सेन्सॉर अधिकार्‍याने छापू दिला नाही म्हणून अग्रलेखाची तेवढी जागा निषेध म्हणून त्यांनी मोकळी सोडली. त्या वेळी मा.गो. वैद्य हे ‘नीरद’ या टोपण नावाने ते लेखन करीत. ‘चांगले राज्य चांगल्यांचे राज्य’ हा त्यांचा लेख वाचून दैनिक हितवादचे त्या वेळचे संपादक ए.डी. मणी यांनी त्यांचे आवर्जून अभिनंदन केले होते.

मा. गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर येथून निघणार आहे. अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former legislative council member M G vaidya is no more