चार दरोडखोरांना शस्त्रांसह अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

अमजद अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला. अटकेतील आरोपींच्या झडतीमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला. त्यांना अटक करून चौकशी केली असता ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे समजले.

नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक केली. तर त्यांचा एक साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला. अटकेतील आरोपींमध्ये सलमान अंसारी अब्दुल रहमान अंसारी (24, रा. बिलाल मशिदीजवळ, यशोधरानगर), मोहम्मद जिशान शेख उर्फ बाबा लंगड्या शेख खलील (22, रा. यादवनगर, गल्ली क्र.18), मोहम्मद आसिफ उर्फ बिच्छु मोहम्मद रफिक (22, रा. गरीब नवाजनगर) आणि रमाकांत उर्फ रामभाऊ प्रकाश शाहू (22, रा. कुंदनलाल गुप्तानगर) यांचा समावेश आहे. फरार आरोपी अमजद खान रशीद खान (39, रा. शिवाजी चौक) याचा शोध पोलिस घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 10 ते 10.40 वाजता दरम्यान यशोधरानगर ठाण्याचे सपोउपनि प्रकाश काळे हे सहकाऱ्यांसह ठाण्यांतर्गत गुन्हेगारांचा शोध घेत होते. दरम्यान गुप्त माहिती मिळाली की, वरील आरोपी एचबीनगर, कळमना रोड येथे पडित बांधकामाचे ठिकाणी जमले आहेत. त्यांच्याजवळ शस्त्र असून काहीतरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत.

या माहितीवरून पोलिसांनी तेथे धाड टाकली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र 4 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. अमजद अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला. अटकेतील आरोपींच्या झडतीमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला. त्यांना अटक करून चौकशी केली असता ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे समजले. पोलिसांनी सर्व आरोपींवर कलम 399,402 आदी कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. 

हेही वाचा : धापेवाडा यात्रेची 280 वर्षांची परंपरा मोडीत निघणार; या कारणामुळे घडणार असे... 

तडीपार गुंडाला चाकूसह अटक 
यशोधरानगर पोलिस ठाण्यातील पथक शिवशक्‍तीनगरात गस्त घालत होते. दरम्यान कुख्यात तडीपार असलेला आरोपी मोबीन अहमद समसुद्‌दीन अहमद (वय 32, महबूबपुरा) हा शस्त्रासह कुठेतरी जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार दीपक साखरे, एस. दराडे, एम. काठोके, सहायक फौजदार विनोद सोलव, दीपक धानोरकर, अक्षय सरोदे, संजय कोटांगळे, गजानन गोसावी, निलेश घायवट यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four robbers arrested with weapons