चारचाकीने ठोकले दुस-या चारचाकीला, दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

रविवारी (ता. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास बोलेरो आणि अल्टो कारच्या अपघातात पोलिस शिपायाचा जागीच मृत्यू झाला. त्याचसोबत खुमारी येथील रहिवासी असलेल्या व्यक्‍तीचासुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मनसर (जि.नागपूर)  : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 7 वरील मनसरपासून 10 किलोमीटर अंतरावरील मरारवाडी गावाजवळ रविवारी (ता. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास बोलेरो आणि अल्टो कारच्या अपघातात पोलिस शिपायाचा जागीच मृत्यू झाला. त्याचसोबत खुमारी येथील रहिवासी असलेल्या व्यक्‍तीचासुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

क्‍लिक करा : कानात आवाज येतोय, तोलही जातो, सावधान ! 

पोलिस शिपायाचा मृतात समावेश 
प्राप्त माहितीनुसार, नागपूर वाहतूक पोलिस रविवारी सकाळी 9.30 ते 10 च्या सुमारास नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मरारवाडी गावाजवळ अवैध वाहतुकीवर कारवाई करताना त्यांनी एका ट्रकला थांबविले. ट्रकच्या मागून येणाऱ्या अल्टो कारचे चालक क्वालिटी इंस्पेक्‍टर पी. गजेंद्र (वय 65, फ्रेंड्‌स कॉलनी नागपूर) यांनी कारची गती हळू केली. त्यांच्यामागून येत असलेल्या बोलेरोने कारला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने पवनीवरून नागपूरकडे जात होती. दरम्यान, महामार्गाच्या मध्ये असलेल्या रस्ता दुभाजकावर बसून नाश्‍ता करीत असलेले पोलिस शिपाई रितेश देवराव भोपरे (वय 32, दिघोरी, नागपूर) यांच्या अंगावर जाऊन कार उलटली. त्यामुळे रितेश भोपरे यांचा जागीच मृत्यू झाला. जवळच बसलेले खुमारी येथील रहिवासी पप्पू पाली गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताबडतोब बचावकार्य सुरू करून इतर पोलिस कर्मचाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. 

क्‍लिक करा  : मटनाचे दर सहाशे रूपये किलो, अन्‌ चामडे ठरतेय मातीमोल 

गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताबडतोब बचावकार्य सुरू करून इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृत आणि जखमींना रुग्णवाहिकेत टाकून नागपूरला रवाना केले. यात कारचालक पी. गजेंद्र यांच्यासोबत छाया गजेंद्र (वय 50) व ज्योती जैस्वाल (वय 45, यवतमाळ) यासुद्धा जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे पाठविण्यात आले. घटनास्थळी वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक संजय विलास शिंत्रे यांनी भेट देऊन सर्व घटना जाणून घेतली. रामटेक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप ठाकूर हे इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four-wheeler hit second wheel, two dead