गिरमकर हत्याकांडातील चौथा आरोपी अजूनही फरार, तीनही आरोपींना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

अमरने मित्र शुभम डोंगरे, मुन्ना तिवारी, बाबा खान यांच्या मदतीने पंकजचा खून केला. त्याचा मृतदेह ढाब्याच्या बाजूला जेसीबीने खड्‌डा खोदून दुचाकीसह पुरला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे, छाया तांबुसकर आणि संतोष मदनकर यांनी सलग 17 दिवस मेहनत घेऊन हत्याकांड उघडकीस आणले.

नागपूर : अनैतिक संबंधातून युवकाने प्रेयसीच्या पतीचा हातोड्याने खून करून ढाब्याशेजारी मृतदेह खड्ड्यात पुरला होता. या हत्याकांडात अटकेतील तीनही आरोपींना पारडी पोलिसांनी (ता. 3) न्यायालयात हजर केले. आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या हत्याकांडातील चौथा आरोपी बाबा खान हा फरार असून, गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे.

सविस्तर वाचा - निघाला होता शाळेत अन रस्त्यात ट्रकखाली सापडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज गिरमकर (वर्धा) हा गुमथळा येथील हल्दीराम फूड्‌स कंपनीत इलेक्‍ट्रिशियन पदावर कार्यरत होता. कापसी परिसरात राहत असताना त्याची मुख्य आरोपी अमरसिंह ठाकूर याच्याशी ओळख झाली होती. त्याचा कापसी रोडवर एजे नावाने ढाबा आहे. अमर आणि पंकज यांची मैत्री झाल्यानंतर त्याची नजर पंकजची पत्नी भारती (बदलेले नाव) हिच्यावर पडली. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी सलगी वाढवली. दोघांची मैत्री झाल्यानंतर प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. याची कुणकुण पंकजला लागताच त्याने अमर आणि पत्नीची समजूत घातली. संबंध तोडण्यास सांगितले. त्यासाठी त्याने नागपूर सोडले आणि पुन्हा मूळ गाव वर्धा गाठले. परंतु, दोघांचा मोबाईलवरून संपर्क सुरू होता. पत्नीच्या व्हॉट्‌सऍपवरील चॅटिंग पंकजने वाचली. त्यामुळे चिडलेला पंकज 28 डिसेंबर रोजी अमरच्या कापसी रोडवरील एजे ढाब्यावर गेला. दोघांत वाद झाला. अमरने मित्र शुभम डोंगरे, मुन्ना तिवारी, बाबा खान यांच्या मदतीने पंकजचा खून केला. त्याचा मृतदेह ढाब्याच्या बाजूला जेसीबीने खड्‌डा खोदून दुचाकीसह पुरला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे, छाया तांबुसकर आणि संतोष मदनकर यांनी सलग 17 दिवस मेहनत घेऊन हत्याकांड उघडकीस आणले. अमरसह शुभम आणि मुन्ना तिवारीला अटक केली. पारडी पोलिसांनी आज तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले. तीनही आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourth accused not found in murder case