रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना 28 लाखांचा गंडा; टोळी पुन्हा सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

पैसे घेतल्यानंतर नीलेशने त्यांची मेडिकलमध्ये वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून कागदपत्रे देखील घेतली. मात्र, या बेरोजगारांना नोकरी लावून न देता 16 जणांची त्याने 28 लाखांनी फसवणूक केली.

नागपूर : रेल्वेतील मोठमोठ्या अधिकाऱ्यांची ओळख असून रेल्वेत नोकरी लावून देतो अशी बतावणी करून बेरोजगारांची 28 लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी सोमलवाडा येथील इंजीनियर को ऑप. हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या नीलेश अग्रवाल उर्फ तिजारे (40) यास अटक केली. शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिषा दाखवून बेरोजगारांना लाखोंनी गंडविणारी टोळी नागपुरात पुन्हा सक्रिय झाल्याचे यावरून स्पष्ट होते.

सविस्तर वाचा - मेट्रोत प्रवासी संख्येचा आलेख उंचावला, एका दिवसात 17 हजार नागरिकांचा प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर 2017 ते 15 नोव्हेंबर 2019 दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. आरोपी नीलेश तिजारेने "मी रेल्वेत नोकरी करतो. माझी मोठ्‌या अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. काही अधिकारी नोकरी लावून देतात त्या अधिकाऱ्यांशी देखील माझी ओळख आहे. तुम्हाला नोकरी हवी असल्यास सांगा' असे त्याने बेरोजगारांना सांगितले होते. नोकरीसाठी चार ते पाच लाख रुपये लागतील. पैसे एकावेळी न देता टप्प्याटप्प्याने द्या. पैसे पूर्ण देऊन झाल्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि तुम्हाला नोकरी मिळेल असेही त्याने सांगितले होते. नीलेशच्या आमिषाला बळी पडून अनेक बेरोजगारांनी त्याला लाखो रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर नीलेशने त्यांची मेडिकलमध्ये वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून कागदपत्रे देखील घेतली. मात्र, या बेरोजगारांना नोकरी लावून न देता 16 जणांची त्याने 28 लाखांनी फसवणूक केली.

याप्रकरणी पवनकुमार गिरीराम शिव (29) यांनी शहर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून नीलेश तिजारे यास अटक केली. पोलिसांनी त्याची 9 फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडी घेतली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in Railway recruitment