मला चार लाखांचा हार एक लाखात विकायचा आहे, अडचण दूर होईल... वाचा सविस्तर

अनिल कांबळे
Thursday, 9 July 2020

नागपूरमधील नंदनवन परिसरात भाजीपाला विक्री करणाऱ्या निर्मला समर्थ आणि नंदकिशोर समर्थ या दाम्पत्याला एका टोळीने एका लाखाला गंडा घातला. त्यांना चार लाखांचे सोने एका लाखात देण्याचे आमिष देण्यात आले होते. त्यानंतर बनावट सोन्याचा हार हाती टेकवून एका लाखाने गंडा घातला. नंदनवन पोलिस या टोळीच्या मागावर आहेत. 

नागपूर : आमच्याकडे चोरीचे खूप सोने आहे... ते आम्हाला स्वस्तात विकायचे आहे... चार लाखांचा सोन्याचा हार फक्‍त एका लाखात देणार... तीन लाखांचा तुमचा फायदा आणि आमचीही अडचण दूर... हा सोन्याच्या हारमधील मनी ठेवा... सोनाराकडून खात्री करा आणि फोन करा... असा जर प्रकार कुणासोबत घडत असेल तर सावधान... ते सोने पांघरून चिंध्या विकणारी टोळी आहे... एकदा का स्वस्तात सोने खरेदीचा मोहात पडले की तुम्हाला एक ते दोन लाखांची गंडा घालण्यासाठी ही टोळी सज्ज आहे. नुकताच एका टोळीविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झटपट पैसा कमविण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या तर काही टोळ्या परस्पर भेट घेऊन आमिष दाखवून लूटमार करणाऱ्या आहेत. त्यामुळे कुणी स्वस्तात सोने विक्रीचे आमिष दाखविल्यास चार हात लांब राहा किंवा लगेच पोलिसांना फोन करून या टोळीबद्दल माहिती द्या. जेणेकरून आपल्यासारखा अन्य कुणी गंडविल्या जाणार नाही.

हेही वाचा - जादूटोणा केल्याचे भूत डोक्‍यात शिरले अन्‌ सांभोरा गावात घडले भयाण खुनी नाट्य...

नुकताच नागपूरमधील नंदनवन परिसरात भाजीपाला विक्री करणाऱ्या निर्मला समर्थ आणि नंदकिशोर समर्थ या दाम्पत्याला एका टोळीने एका लाखाला गंडा घातला. त्यांना चार लाखांचे सोने एका लाखात देण्याचे आमिष देण्यात आले होते. त्यानंतर बनावट सोन्याचा हार हाती टेकवून एका लाखाने गंडा घातला. नंदनवन पोलिस या टोळीच्या मागावर आहेत. 

असा रचतात सापळा

सोने विकण्यासाठी जवळपास एक ते दोन लाख रुपये मालक असलेला व्यक्‍ती शोधतात. त्यांना हेरून स्वस्तात सोने विकण्याचे आमिष दाखविले जाते. विश्‍वास बसावा म्हणून सोन्याचा एक दागिना लगेच त्या व्यक्‍तीला दिला जातो. त्यानंतर सोनाराकडून चेक करून आणण्यास सांगितल्या जाते. सोनाराकडून दागिना खरा असल्याची खात्री पटल्यानंतर शिकार जाळ्यात अडकते. त्याला चार ते आठ लाखांचे सोने दाखविण्यात येते. पैसे हाती येताच बनावट सोन्याचे दागिने ग्राहकाच्या हाती दिले जातात. चोरीचे सोने असल्यामुळे घरी जाऊन उघडण्यास सांगितले जाते.

अधिक माहितीसाठी - गुड न्यूज : नागपूर जिल्हयाच्या "या' तालुक्‍यात होणार राज्य राखीव महिला पोलिस बटालियन केंद्र...

पोलिस तुम्हाला योग्य ती मदत करतील 
स्वस्तात सोने विक्रीच्या आमिषाला बळी पडू नका. तो एक सापळा आहे. कुणीही स्वस्तात सोने विकणार नाही, हे लक्षात घ्या. गरज भासल्यास थेट पोलिसांत तक्रार करा. पोलिस तुम्हाला योग्य ती मदत करतील. 
- डॉ. नीलेश भरणे, 
अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त

(संपादन - नीलेश डाखोरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud with reach people in Nagpur