पैसे गेले, पण कार मिळालीच नाही; तरुणाची पावणेतीन लाखांनी फसवणूक

अनिल कांबळे
Monday, 2 November 2020

चव्हाण यांनी जवळपास ३१ ऑक्टोबर २०२०, असे दीड वर्षांपर्यंत त्याचा पाठपुरावा केला. मात्र, आरोपी रमेश रूद्राने त्यांना प्रतिसाद दिला नाही. चव्हाण यांनी कार देत नसाल तर पैसे परत द्या, असा तगादा लावला. पण आरोपीने त्यांना पैसेही परत दिले नाही.

नागपूर : कारचा २ लाख ८० हजार रुपयात खरेदी करायचे ठरले. बुकिंग म्हणून ५ हजार रुपये आणि नंतर २ लाख ८० हजार रुपये बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. पण, ना कार दिली, ना पैसे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर हिंगणा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार हिंगणा पोलिसांनी दोन आरोपीपैकी एकाला अटक केली. रमेश लक्ष्मण रुद्रा, असे अटकेतील आरोपीचे नाव असून, पंकज देशमुख या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. 

हेही वाचा - चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, 'माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज देशमुख (रा. अमरावती) याने तक्रारदार निखिल दिलीपसिंग चव्हाण (वय ३१) यांना ३० जानेवारी २०१९ ला नागपूर येथील महिंद्रा कंपनीच्या यार्डमध्ये लिलावाच्या वेळी गाड्या स्वस्त विकल्या जातात असे सांगितले. दरम्यान, आरोपी रमेश लक्ष्मण रुद्रा (वय ४०, रा. वडधामना, नागपूर) हे बालाजी ऑटो फायन्सासचे मालक असून माझा चांगला मित्र असल्याचे आमिष दाखवून निखिल चव्हाण यांना नागपूरला बोलावले. चव्हाण नागपूरला आले असता पंकज देशमुखने त्यांची रमेश रूद्राशी भेट घालून दिली. त्यांनी चव्हाण यांना वाडी हद्दीतील महिंद्रा यार्ड येथे नेऊन एमएच ४९ / यू ६३३६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारोती स्विफ्ट कार दाखवली. त्यानंतर २ लाख ८० हजार रुपयांत सौदा ठरविला. चव्हाण यांनी आरोपी रमेश रूद्रा याला इन्डसइंड बँकेच्या खात्यात बुकिंगसाठी ४ फेब्रुवारी २०१९ ला २५ हजार रुपये आणि १२ फेब्रुवारी २०१९ ला २ लाख ५५ हजार रुपये ट्रान्सफर केले. अशाप्रकारे चव्हाण यांनी रमेश रूद्राच्या अकाऊंटमध्ये एकूण २ लाख ८० हजार रुपये ट्रान्सफर केले. पण, त्यानंतर त्यांना कार देण्यास टाळाटाळ सुरू केली. 

हेही वाचा - विदारक सत्य! या गावात मृत्यू झाल्यास भर रस्त्यात केले...

चव्हाण यांनी जवळपास ३१ ऑक्टोबर २०२०, असे दीड वर्षांपर्यंत त्याचा पाठपुरावा केला. मात्र, आरोपी रमेश रूद्राने त्यांना प्रतिसाद दिला नाही. चव्हाण यांनी कार देत नसाल तर पैसे परत द्या, असा तगादा लावला. पण आरोपीने त्यांना पैसेही परत दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निखिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपी रमेश रूद्रा यास अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud of three lakh in car selling in nagpur