हे काय चाललयं! भाचीलाच बनवलं ‘मामा’; घातला पाच लाखांचा गंडा

अनिल कांबळे
Monday, 9 November 2020

ठाकूर यांच्यासह मध्यप्रदेशातील शेकडो गुंतवणूकदारांनी कोल्हे बंधूच्या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, मुदतपूर्ण झाल्यानंतरही कोल्हे बंधूने गुंतवणूकदारांना व्याज व बोनस दिले नाही. अशाप्रकारे कोल्हे बंधूने साथीदाराच्या मदतीने गुंतवणूकदारांची तब्बल ३५ कोटी रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणात तपास विशेष तपास पथक करीत आहे.

नागपूर : शहरात चोरीच्या घटनांसह ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. रोज एक ना एक घटना घडतच असते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात मामानेच भाचीला गंडा घातल्याची घटना पुढे आली आहे. तसेच दोन ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भाचीला साडेपाच लाखांनी मामाने गंडा घातला. बाळकृष्ण आचार्य (४७ रा. कळमना) असे फिर्यादीचे नाव आहे. बाळकृष्ण योगशिक्षक आहे. ते गरजूंच्या घरी जाऊन योग शिकवितात. ते दहावी नापास आहे. त्यामुळेच सरकारतर्फे असलेला योगा कोर्स करता आला नाही. त्यासाठी बारावी पासची गुणपत्रिका मिळवून देण्याचे आमिष पत्नीचे आरोपी मामा देवेंद्र काटे (४३) यांना दिले. त्यासाठी ४५ हजार रुपये घेतले.

जाणून घ्या - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून

आरोपी देवेंद्र काटे याने आरोपी गगन दुरुगकर (२५) याच्या कॉम्प्युटर लॅबमधून बारावी पासचे बोगस प्रमाणपत्र तयार केले. २०१८ ला दिल्ली बोर्डचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आचार्य यांना लक्षात आले. पती-पत्नीच्या फसवणूक प्रकरणाची ही तक्रार फिर्यादी बाळकृष्ण आचार्य यांनी नंदनवन ठाण्यात दिली. बाळकृष्ण यांच्या पत्नी उच्चशिक्षित आहेत. त्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपी मामाने दिले. यासाठी आरोपी तुषार गोणारकर (२१), निषांत गोणारकर (२१) यांच्यासोबत मिळून फिर्यादीकडून ५ लाख ५० हजार रुपये घेतले.

दुसऱ्या घटनेत डीजिटल जाहिरातीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची ३५ कोटींनी फसवणूक करण्यात आली. नागेंद्रसिंग बाबूसिंग ठाकूर (वय ६५ रा. बैतुलगंज, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी सुशील रमेश कोल्हे (वय २९), पंकज रमेश कोल्हे (वय २७, दोन्ही रा. निमदेवी, कळमना) व भरत शाहू या तिघांविरुद्ध फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - अहोऽऽ हे काय केलं? आता कशाला सोडलं पाणी; तुमच्या चुकीमुळे दिवाळी गेली ना अंधारात

कोल्हे बंधूचे सीताबर्डीतील उत्कर्ष अपार्टमेंट येथे डीजिटल ॲडव्हरटाइजमेंट नावाचे कार्यालय आहे. २०१८ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत कोल्हे बंधूंनी कंपनीत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला तीन टक्के व्याज व बोनस देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले.

ठाकूर यांच्यासह मध्यप्रदेशातील शेकडो गुंतवणूकदारांनी कोल्हे बंधूच्या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र, मुदतपूर्ण झाल्यानंतरही कोल्हे बंधूने गुंतवणूकदारांना व्याज व बोनस दिले नाही. अशाप्रकारे कोल्हे बंधूने साथीदाराच्या मदतीने गुंतवणूकदारांची तब्बल ३५ कोटी रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणात तपास विशेष तपास पथक करीत आहे.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

तिसऱ्या घटनेत फोन पेच्या कस्टमर केअरचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून सायबर गुन्हेगाराने नऊ लाखांनी गंडा घातला. ही घटना कोराडी भागात घडली. धीरज अशोक मनघटे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेश शर्मा याच्याविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ॲप डाउनलोड करताच बसला फटका

चार नोव्हेंबरला धीरज याच्या मोबाइलवर राजेश शर्मा याने संपर्क साधला. वडिलांच्या नावे असलेल्या फोन पेच्या खात्यात क्रेडिट लिमिट वाढवून देण्याचे आमिष त्याने धीरज याला दिले. राजेश याने धीरज याला मोबाइलमध्ये ऐनीडेस्क नावाचा ॲप डाउनलोड करायला लावला. ॲप डाउनलोड करताच धीरज याच्या वडिलांच्या खात्यातून आठ लाख ९५ हजार रुपये राजेश याने स्वत:च्या खात्यात वळते केले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud with three people in Nagpur City