समता एक्स्प्रेसवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; लोहमार्ग पोलिसांची कामगिरी 

योगेश बरवड 
Saturday, 14 November 2020

२८ ऑक्टोबरच्या रात्री विशाखापट्टमवरून नवी दिल्लीकडे निघालेली समता एक्स्प्रेस नागपूरच्या आउटरवर असताना अचानक दरोडेखोर गाडीत शिरले. उत्तर प्रदेशचे नीलेश गुप्ता, सुनील गुप्ता यांना चाकूच्या धाकावर लुटले.

नागपूर ः समता एक्स्प्रेसमधील दरोड्याच्या घटनेचा छडा लावत लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने टोळीतील सहा आरोपींना अटक केली आहे.

नरेश ऊर्फ लखन भंडारकर (२०) रा. टिमकी, मोहम्मद अतिक मोहम्मद रफीक (२०) रा. मोमिनपुरा, शेख शाहरूख ऊर्फ मुन्ना (२०) रा. ज्योतीनगर खदान, रजत देवघरे (२३) रा. देवघरे मोहल्ला, गांजाखेत चौक, सक्षम ऊर्फ बोंड्या मौंदेकर (१९) रा. गोळीबार चौक, कमलेश ऊर्फ जंगली ऊर्फ कम्मो (२३) रा. टिमकी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

२८ ऑक्टोबरच्या रात्री विशाखापट्टमवरून नवी दिल्लीकडे निघालेली समता एक्स्प्रेस नागपूरच्या आउटरवर असताना अचानक दरोडेखोर गाडीत शिरले. उत्तर प्रदेशचे नीलेश गुप्ता, सुनील गुप्ता यांना चाकूच्या धाकावर लुटले. भोपाळला जाणारा मनीष पटले आणि जितेश पटलेलाही जखमी करून लुटले.

 यानंतर गाडीतून उड्या टाकून अंधारात पसार झाले. लोहमार्ग पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दरोडेखोरांच्या शोधात होते. शाहरूखला यापूर्वीच मोमिनपुरा येथील रेल्वे मार्गाजवळून ताब्यात घेण्यात आले. त्याने अन्य साथीदारांची माहिती दिली होती. परंतु, सर्वच फरार होते. गुरुवारी लखन व अतिकला ताब्यात घेण्यात आले.

त्यांनी अन्य आरोपींबाबत माहिती दिली. त्या आधारे अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दरोड्याच्या घटनेसाठी वापरलेले दोन्ही चाकू तसेच २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सविस्तर वाचा - नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई 

गुन्हे शाखेचे प्रभारी कविकांत चौधरी, हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, चंद्रशेखर येळेकर, श्रीकांत धोटे, विनोद खोब्रागडे, अविन गजवे, अमित त्रिवेदी, गिरीश राऊत, विजय मसराम, संदीप लहासे. नलिनी भानारकर व मंगेश तितरमारे यांचा या कारवाईत समावेश होता.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gad who looted samta express caught by RPF