असाही एक अवलिया! शाळाबाह्य मुलांसाठी करीत आहेत धडपड; चार वर्षांत केले हे...

Gaikwad brought hundreds of out-of-school children into the stream of education
Gaikwad brought hundreds of out-of-school children into the stream of education

नागपूर : बालकामगार, रस्त्यांवरील मुले, वेश्यांची मुले, आदिवासी भागातील मुले, ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर, बांधकाम मजूर, दगडखाण मजूर, मुस्लिम वस्त्यांतील मुले, भटक्या-विमुक्तांची अशी शेकडो मुले शाळेत दाखल करून मूळ शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवार, ता. सावनेर येथील जि. प. शाळेचे शिक्षक प्रसेनजित गजानन गायकवाड यांनी केले आहे.

पाड्यावर, ऊसतोड कामगार, बांधकाम मजूर या भागातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्याचे काम गायकवाड चार वर्षांपासून करीत आहेत. मुलांचा शोध घेणे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, परिसरातील शाळेत संबंधित मुलांना दाखल करणे या सगळ्या कार्यात गायकवाड यांनी स्वतःला झोकून देत तब्बल ११० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

माजी शिक्षण सचिव नंदकुमारजी यांच्या प्रेरणेतून बालरक्षक या अभियानाला सुरुवात झाली. नेहमीच्या कामात आणखी एका कामाची भर म्हणून बहुतांश शिक्षकांनी या अभियानाकडे कानाडोळा केला. परंतु, भटक्या-विमुक्तांच्या मुलांबाबत असलेली कणव गायकवाड यांनी या माध्यमातून दाखवून देत गावातील वस्त्या धुंडाळीत मुलांचा शोध घेतला. बालकामगार, अल्पवयात विवाह होत असलेल्या मुली यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्यात त्यांना यश आले.

एकदा मुलांना शाळेत टाकले की, मुले काही दिवस येतात. त्यानंतर ते आपल्या पालकांबरोबर दुसऱ्या ठिकाणी जातात, असे लक्षात आल्यावर शाळेतील ‘शिक्षण हमी कार्ड' या योजनेचा प्रभावी वापर गायकवाड यांनी सुरू केला. याअंतर्गत कुठल्याही गावातील जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश केलेले विद्यार्थी कुठेही गेले तरी संबंधित परिसरातील शाळेत त्यांना पुढील शिक्षणाची परवानगी दिली जाते. यामुळे शाळाबाह्य मुलांचा शाळेत जाण्याचा टक्का वाढला आहे.

महाराष्ट्रभरात बालरक्षकांची नेमणूक

लॉकडाउन काळात शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे सोप झाले आहे. त्याचा फायदा घेत शिक्षकांनी जास्तीत जास्त मुले शाळेत दाखल करावीत. यासाठी महाराष्ट्र भरात बालरक्षकांची नेमणूक केली जात आहे. संबंधित बालरक्षक बालक, पालक आणि शिक्षकांचे समुपदेशन करतात. याशिवाय पोक्सो, बालसंरक्षक कायदा, बालविवाह, बालमजुरी इत्यादी कायद्यांचे प्रबोधन समाजात करतात. विदर्भात विनोद राठोड, धीरज भिशीकर, माधुरी सेलोकर इत्यादी बालरक्षक सक्रिय कार्य करीत आहेत.

साम, दाम, दंड, भेद सर्वच प्रकारचा वापर
शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे खूप जिकरीचे काम आहे. पालकांना, मुलांना आणि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनाही यासाठी तयार करावे लागते. साम, दाम, दंड, भेद सर्वच प्रकार वापरून मुलांना शाळेत घालायचेच, हा एकच विचार मला पछाडून टाकतो. त्यामुळे आजवर शंभरावर मुलांना शाळेत दाखल केले असे वाटते.
- प्रसेनजित गायकवाड,
बालरक्षक, नागपूर जिल्हा

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com