लॉकडाउनचा गणपती बाप्पालाही फटका, मूर्तिकारांचा श्रीगणेशाही नाही

नागपूर : घरगुती मूर्ती बनविताना नितीन माहुलकर आणि कुटुंबीय.
नागपूर : घरगुती मूर्ती बनविताना नितीन माहुलकर आणि कुटुंबीय.

नागपूर ः कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांत अनेकांना सण घरातच साजरे करावे लागले. त्यातून कुणीही सुटलेले नाही. याचा फटका आता गणपती बाप्पालाही बसला आहे. गणपती बाप्पाचे आगमन ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होत असले तरी आगमनाची तयारी उन्हाळ्यापासून सुरू होते.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. मात्र, गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदर सुरू होणाऱ्या कामाचा अद्यापही कच्च्या मालाअभावी "श्रीगणेशा' झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील चार ते पाच हजार मूर्तिकारांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होणार आहे. कोरोनाने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरवले असून श्रीगणेशा न झाल्याने मूर्तिकारांचीही चिंता वाढली आहे. मूर्तींसाठी आवश्‍यक असणारी माती नरखेड तालुक्‍यातील सावरगाव, भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून आणली जाते. मात्र, लॉकडाउनमुळे अद्यापही माती मूर्तिकार आणू शकले नाही.

लॉकडाउन जरी उठले तरी मालच नसल्यामुळे पुरवठादार माल कसा पुरवणार? असा प्रश्न मूर्तिकारांपुढे उपस्थित झाला आहे. त्यामुळे, मूर्तिकारांच्या समोरच्या अडचणी अधिक वाढणार आहेत. गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदर गणेशमूर्तीच्या कामाला सुरुवात होते. यंदाचा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात येत आहे. त्यामुळे, गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला एप्रिलपासनू प्रारंभ होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाचा परिणाम गणेशमूर्तीच्या निर्मितीवरही झाला आहे. सध्या त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या मातीतूनच मूर्तीची निर्मिती ते करीत आहेत. मात्र, कच्च्या मालाअभावी मूर्तीच्या संख्येत कोरोनामुळे घट होणार असल्याची शक्‍यता मूर्तिकारांनी वर्तविली आहे. दरवर्षी शहरात गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने मूर्ती विक्री होत असते.

काही मूर्ती जिल्ह्यातील विविध गावांमधूनदेखील येतात. त्यामुळे, कोट्यवधी रुपयांच्या गणेशोत्सवाच्या उलाढालींवरच त्याचा परिणाम आगामी काळात अधिक जाणवण्याची शक्‍यता आहे. शहरात अनेक कारागीर गणेशमूर्तीसहित देखाव्यांच्या मूर्तीही घडवितात. त्यांचे नियोजन एप्रिल-मे महिन्यापासूनच सुरू होते. काही कारागीर कोरोनाच्या धास्तीमुळे गावाकडे निघून गेले आहेत. त्यातच रंग, ब्रश यांसारख्या व्यवसायाशी निगडित अनेक वस्तूंची बाजारपेठही बंद आहे. गणेशमूर्तीसाठीच्या ऑर्डर मूर्तिकारांना नाहीत. एकंदरीतच गणेशाच्या स्वागताची तयारी काहीच नसून, प्रत्येक जण कोरोनाच्या संकटाशीच सामना करत असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

मूर्ती प्रक्रियेवर परिणाम
मूर्ती बनविण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळ खाऊ असल्याने मूर्तिकार दिवाळीनंतर घरगुती मूर्ती बनविणे सुरू करतात. एप्रिलमध्ये या मूर्तींना रंगरंगोटीचे काम सुरू केल्या जाते. मात्र, लॉकडाउनमुळे या सर्व प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.

मंडळामध्ये घरगुती गणपती?
पावसाळ्याच्या आधी, एप्रिल महिन्यामध्ये सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींसाठी कच्चा माल गोळा केला जातो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व साहित्य गोळा करण्याचे नियोजन मूर्तिकारांचे असते. मात्र, लॉकडाउनमुळे अद्याप हे साहित्य मूर्तिकारांनी गोळा केले नाही. लॉकडाउन पावसाळ्या पूर्वी न उघडल्यास घरगुती बाप्पाच्या मूर्ती मंडपामध्ये पाहायला मिळू शकतात.

घरगुती गणपती बनविणारे काही मूर्तिकार वर्षभर काम करतात. तर, काही मूर्तिकार हंगामी स्वरूपात काम करतात. या दरम्यान मूर्तिकारांचे संपूर्ण कुटुंब या कामात गुंतलेले असते. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला माती गोळा करण्याची परवानगी न दिल्यास आम्हा मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ येईल.
-सुरेश पाठक, मुख्य संयोजक, प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीविरोधी कृती समिती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com