हौशी तरुणाईला संधी; गरब्याचा नृत्याविष्कार दाखवा ऑनलाईन

Garba Dance Discovery Show Online
Garba Dance Discovery Show Online

नागपूर : कोव्हिडमुळे नवरात्रीतील गरब्यावरही विरजण पडले असून अनेक दिवसांपासून नृत्याचे प्रशिक्षण घेणारे निराश झाले आहे. मात्र, आता निराशा झटकून घरीच पारंपरिक वेशभूषेत गरबा करून नवरात्रीचा उत्साह कायम ठेवण्याची संधी आहे. घरी केलेल्या गरब्याची चित्रफीत तयार करून एका संस्थेला पाठवून गरब्याचा नृत्याविष्कार लोकांनाही दाखविता येणार आहे. शहरातील एका तरुण दाम्पत्यामुळे तरुणाईच नव्हे तर गरब्याची हौस असलेल्या प्रत्येकालाच डीजिटल गरबाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने अद्यापही सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी कायम ठेवली आहे. परिणामी यंदा प्रथमच नवरात्रीचा उत्सव तसेच या उत्सवातील आकर्षण असलेल्या सार्वजनिक गरबा कार्यक्रमांवरही बंदी आहे. त्यामुळे गरबा नृत्याला परवानगी मिळेल, या अपेक्षेने प्रशिक्षण घेणाऱ्या अनेकांची निराशा झाली. गरबाच नसल्याने तरुणाईतील जोशच हरवल्याचे चित्र आहे. परंतु आता तरुणाईच नव्हे गरबा नृत्याची हौस असलेल्या प्रत्येकासाठीच शहरातील निखिलेश सावरकर व ॲड. भूमिता सावरकर या तरुण दाम्पत्यांसह मनोज रंगारी यांनी डिजिटल गरबाची संकल्पना पुढे आणली.

गरबा नृत्याची हौस असलेल्या तरुण तसेच इतर हौशींना पारंपरिक वेशभूषेत घरीच कुटुंबीयांसोबत गरबा केल्याची चित्रफीत (व्हिडिओ) पाठविता येणार आहे. ही चित्रफीत ‘आयसीटी लाईव्ह’ या संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण, तरुणींना गरबा नृत्याविष्कार सार्वजनिकरीत्या दाखविता येणार आहे. ही चित्रफीत केवळ तीन मिनिटांची असावी, असे ॲड. भूमिता सावरकर यांनी सांगितले.

चित्रफीत contact@ictmedia.in या संकेतस्थळावर पाठविता येणार आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवर #ictdigitalgarba, #ictlivenagpur या हॅशटॅगसह @ictliveinsta यावर व्हिडिओ अपलोड करता येणार आहे. फेसबुकवर @ictlive.in येथे टॅग करता येणार आहे. नागरिकांना २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान व्हीडिओ पाठविता येईल. याच दरम्यान सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत दररोज प्रसारण केले जाणार आहे.

सरकारची परवानगी नाही
कोरोनामुळे गर्दीच्या कार्यक्रमावर अजूनही बंदी आहे. गणेशोत्सवही अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे दुर्गोत्सवही गर्दी न करता साजरा करावा. गरबा कार्यक्रमही करता येणार नाही. याला सरकारची परवानगी नाही.
- राधाकृष्णन बी.
आयुक्त, मनपा.

डीजिटल गरबाचा विचार पुढे
गरबा करण्याची परवानगी मिळेल, या अपेक्षेने अनेकांनी प्रशिक्षण घेतले. अशा लोकांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी डीजिटल गरबाचा विचार पुढे आला. नागरिकांनी घरीच गरबा करून त्याचे व्हिडिओ पाठवावे. ते संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात येईल.
- ॲड. भूमिता सावरकर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com