अंड्यातून मिळवा रोजगाराचा फंडा... वाचा कसा?

राघवेंद्र टोकेकर
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

तरुणाईलाच उद्योजकतेचा मार्ग दाखविणाऱ्या तरुणाचे नाव आहे, मनीष आत्राम. वय अवघे 20 वर्षे. बालपणापासूनच नियतीने अडथळे निर्माण केले. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षाही जीवनातील प्रसंग अधिक अनुभव संपन्न करणारे ठरले.

नागपूर  : लहानपणीच वडील दुरावले. गंभीर आजाराने आईलाही हिरावून नेले. मागे राहिला तो कर्जाचा डोंगर. दोन वेळ पोट भरण्याचीही भ्रांत. शिक्षण मागे पडले. जवळ दमडीही नाही. अशा विषम स्थितीत अडकलेल्या तरुणाला अंड्यातून रोजगाराचा फंडा मिळाला. "फिक्‍स' पगारापेक्षा "रिस्क' अधिक मिळकत देणारी असल्याचे त्याला उमगले. महिन्याकाठी या तरुणाची उलाढाल लाखोंच्या घरात पोहचली.

तरुणाईलाच उद्योजकतेचा मार्ग दाखविणाऱ्या तरुणाचे नाव आहे, मनीष आत्राम. वय अवघे 20 वर्षे. बालपणापासूनच नियतीने अडथळे निर्माण केले. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षाही जीवनातील प्रसंग अधिक अनुभव संपन्न करणारे ठरले. आजारपणात आई गेली तेव्हा केवळ कर्जाचा डोंगर आणि भविष्याबाबतचे असंख्य प्रश्‍न येवढेच त्याच्या झोळीत शिल्लक होते.

आश्‍चर्य! महामार्गच सांगतो, जा रॉंग साइड!

या विषम स्थितीतही मनीष आणि त्याच्या दोन भावांनी हार मानली नाही. मनीषने नोकरी स्वीकारली. धाकट्या निखीलला शिकवायचेच हा दोन्ही थोरल्या भावांचा निर्धार. त्यासाठी दिवसभर राबायचे. पण, तेवढ्या मिळकतीत घर चालविणेही कठीण होते. मनीषने एकएक करीत हजार दीड हजार रुपये गाठीशी जोडले. पुन्हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. कमी खर्चातील अंड्याच्या व्यवसायातील अर्थशास्त्र समजून घेतले. अनेकांकडून मार्गदर्शन घेतले. दोन दुकानांपासून व्यवसाय सुरू केला. बोलण्यात पटाईत असणारा मनीष कुणालाही आपलेसे करून घेतो. परिश्रमाची तयारी, इतरांपेक्षा चांगल्या दर्जाचा माल कमी किमतीत देण्याचा त्याचा अट्टाहास राहीला. यामुळेच अल्पावधीत ग्राहक जोडले जाऊ लागले. आज तो दीडशेहून अधिक दुकानांमध्ये जवळपास 3 हजार ट्रे अंडी पुरवितो.

त्यातून जवळपास 2 हजार रुपये शिल्लक राहतात. म्हणजेच वार्षिक पॅकेज 7 लाखाच्याही वर आहे. अलीकडेच त्याने हिंगणा टी-पॉइंटवर कार्यालय सुरू केले. लहान भाऊ निखिलही अभियांत्रिकीच्या शिक्षणासह या व्यवसायात मदत करतो. दोन मुलांनाही मनीषने रोजगार मिळवून दिला. मराठी तरुणांनी नोकरीच्या फंदात न पडता स्वत:चा व्यवसायच करावा असा, त्याचा सल्ला आहे.

रोजगार निर्माण करण्याचा निर्धार

अन्य गरजुंच्या हाताला काम मिळावे, असा त्याचा आग्रह आहे. त्यासाठीच तालुका स्तरापर्यंत व्यवसाय विस्ताराची योजना आखली आहे. याशिवाय दुकानदारांना कन्वींस करा. फोन करून ऑर्डर द्या, एका क्रेटवर 2 रुपये कमीशन मिळेल. अशी योजना त्याने तरुण आणि महिलांसाठी आखली आहे. थोडा प्रयत्न केल्यास रोज 50 क्रेट कुणीही घरबसल्या विकू शकतो, असा त्याचा विश्‍वास आहे.

 

सामाजिक भान

अचानक आई आजारी पडली. डॉक्‍टरांनी किडनीचा आजार असल्याचे निदान केले. डायलीसीससाठी आठवड्याचे 10 हजार रुपये लागायचे. तिन्ही भावांनी रात्रंदिवस कष्ट उपसून आईला सहा वर्षे जगवले. पण, नियतीने डावसाधत तिन्ही भावांच्या परिश्रमाला परास्त केले. हा आघात मनीषच्या मनावर खोलवर जखम करणारा ठरला. शक्‍य झाल्यास धर्मार्थ डायलीसीस केंद्र आणि रक्त तपासणी पॅथॉलाजी सुरू करण्याचा त्याचा मानस आहे. आजही तो गरजू मुलांना जमेल तशी मदत करीत सामाजिक भान जपतो.

पैसे वाचवून व्यवसाय सुरू करावा
सिगरेटचे झुरके उडविण्यापेक्षा तरुणांनी पैसे वाचवून व्यवसाय सुरू करावा. छोटी सुरुवातही कालांतराने व्यापक होत जाते. गुजरातच्या तरुणांनी व्यवसाय, उद्योगाची कास धरीत सम्रुद्धी साधली आहे. मराठी तरुणांनीसुद्धा व्यवसाय उद्योगाची कास धरून समृद्धीच्या दिशेने पाऊल टाकावे.
मनीष आत्राम, तरुण व्यावसायिक.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get the Egg Employment