
हातावरील सूज कमी करण्यासाठी उपचार सुरू असल्यामुळे जनरल वॉर्डात आईसह बाळाला ठेवण्याची विनंती जयंत यांनी केली; मात्र डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गरज नसतानाही पहलला आयसीयूत ठेवले. त्यामुळे शनिवारी पहाटे लागलेल्या आगेत पहलाचा होरपळून मृत्यू झाला.
नागपूर : २० दिवसांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीच्या हाताला गाठ झाली होती. उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर गरज नसतानाही आयसीयूत ठेवण्यात आले. वडिलांनी आक्षेप घेतला तरीही रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. जर विनाकारण आयसीयूत ठेवले नसते तर तिचा जीव गेला नसता. ‘रुग्णालय प्रशासनाने मुलीचा नाहक बळी घेतला’, असा आरोप जयंत बसेशंकर यांनी केला आहे.
जयंत बसेशंकर हे मोहाडी तालुक्यातील जांब या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे लग्न मार्च २०१९ मध्ये सातोना येथील प्रियंकाशी झाले. १२ डिसेंबर २०२०ला सुखी संसारावर फूल उमलले. घरात आनंदीआनंद होता. प्रसूती व्यवस्थित झाली. आई प्रियंकाचीही प्रकृती ठीक होती. त्यामुळे १५ डिसेंबरला प्रियंका आणि मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बारशाचा मोठा कार्यक्रम केला. नातेवाइकांना बोलाविण्यात आले. मोठ्या आनंदात कार्यक्रम पार पडला.
जाणून घ्या - (Video) Bhandara Hospital fire news : दोनदा पडलो पण पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले
पहल ऊर्फ जिनल असे मुलीचे नाव ठेवण्यात आले. ३० डिसेंबरला पहलच्या एका हातावर अचानक सूज आली. त्यामुळे प्रियंका आणि जयंत काळजीत पडले. त्यांनी लगेच पहलला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून हातावरील सूज कमी करण्यासाठी औषधोपचार सुरू केले. ७ जानेवारीपर्यंत पहलच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे डॉक्टरांनी दोन दिवसांत सूज उतरल्यावर सुटी देण्यात येईल, असे सांगितले.
हातावरील सूज कमी करण्यासाठी उपचार सुरू असल्यामुळे जनरल वॉर्डात आईसह बाळाला ठेवण्याची विनंती जयंत यांनी केली; मात्र डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गरज नसतानाही पहलला आयसीयूत ठेवले. त्यामुळे शनिवारी पहाटे लागलेल्या आगेत पहलाचा होरपळून मृत्यू झाला. हा आघात आमच्यासाठी असहनीय आहे. पहलचा मृत्यू नसून केवळ डॉक्टरांच्या नाकर्तेपणाचा बळी आहे, असा आरोप जयंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.
माया पोरीले आयसीयूत ठेवले होते. अंगावरील दूध नसल्यामुळे पोरीले बाहेरून दूध आणत होतो. माया नवरा रात्री दूध घेऊन दवाखान्यात आला; पण नर्सबाईने माया पोरीले दूध बी पाजू नाई दिलं जी. पोरगी लयच रडे, पण नर्सबाईला किव नाई आली. अन् मायी पोरगी उपाशीच मेली जी, असा आक्रोश करीत पहलची आई प्रियंका बसेशंकर हंबरडा फोडत होती.
संपादन - नीलेश डाखोरे