तब्बल १५ वर्षांनी झालं तिसऱ्या पाहुण्याचं आगमन अन् रात्री एका क्षणात कोसळला दुःखाचा डोंगर 

अनिल कांबळे 
Sunday, 10 January 2021

देव-नवस आणि वैद्य आणि दवाखाने करून झाले. त्यामुळे हिरा आणि रूखमा नैराश्‍यात गेले. दरम्यान त्यांना पंधरा वर्षांनंतर ‘गुड न्यूज’ मिळाली. त्यांना तीन दिवसांपूर्वीच गोंडस मुलगी झाली. दोघेही पती-पत्नीच्या चेहऱ्यावरील आनंद मावेनासा झाला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे बाळ आयसीयूत होते

भंडारा ः वनमजूर असलेल्या हिरालाल आणि रूखमा ऊर्फ हिरकन्या यांचा धूमधडाक्यात लग्नाचा बार उडाला. सुखी संसार सुरू असताना दोघांनाही तिसऱ्या पाहुण्यांचे वेध लागले. मात्र, लग्नाच्या पंधरा वर्षांपर्यंत दोघांनाही संतती सुख नव्हते.

देव-नवस आणि वैद्य आणि दवाखाने करून झाले. त्यामुळे हिरा आणि रूखमा नैराश्‍यात गेले. दरम्यान त्यांना पंधरा वर्षांनंतर ‘गुड न्यूज’ मिळाली. त्यांना तीन दिवसांपूर्वीच गोंडस मुलगी झाली. दोघेही पती-पत्नीच्या चेहऱ्यावरील आनंद मावेनासा झाला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे बाळ आयसीयूत होते. उद्या सुट्टी होणार असल्यामुळे एका दिवसापूर्वीच पतीने घरच्यांना माहिती दिली. 

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

घरी पाळणा सजला आणि त्या चिमुकलीच्या आगमनाची वाट पाहणे सुरू होते. मात्र हा सुख नियतीला मान्य नव्हते. रात्री दोन वाजता लागलेल्या आगीत आयसीयूत उपचार घेतलेले बाळाचा मृत्यू झाला. ही वार्ता कानी पडताच कानात शिसे ओतल्यागत दोघेही पती-पत्नीला झाले. दोघांच्या दुःखाला सीमा नव्हती. बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

रूखमा ऊर्फ हिरकन्या आणि हिरालाल भनारकर (रा. परसोडी, ता.चांदोरी) यांची एका लग्नात भेट झाली. नातेवाईक असल्यामुळे लगेच लग्नाची बोलणी झाली. थाटात लग्न झाले. वनमजूर असलेला हिरालाल हा बाहेरगावी कामाला जात होता. लग्नाला तीन वर्षे झाले तरी मूलबाळ होत नसल्यामुळे दोघेही निराश होते. मात्र, त्यांनी एकमेकांना सावरून घेतले. लग्नाच्या १५ वर्षांनंतर रूखमाला दिवस गेले. त्यामुळे मनोमन सुखावले. सातवा महिना लागल्यामुळे रूखमा ही आईकडे उजगाव येथे राहायला आली. गेल्या चार दिवसांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयात ती प्रसूतीसाठी दाखल झाली.

लक्ष्मी आली घरा...

डॉक्टरांनी रूखमाला लक्ष्मी घरी आल्याचे सांगतात तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. लगेच हिरालालने मिठाई वाटून आनंद साजरा केला. भेट घेण्यासाठी नातेवाइकांची गर्दी होती. मुलीचे वजन कमी असल्याने आयसीयूत ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी बारा वाजता सुटी होणार असा निरोप डॉक्टरांनी दिला. त्यामुळे आजची रात्र काढल्यानंतर उद्या घरी जाण्यासाठी पती-पत्नी उत्सुक होते.

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

स्वप्नांचा झाला चुराडा

नेहमी बाहेरगावी वनमजुरीला जाणाऱ्या हिरालालने आता मुलगी झाल्यामुळे गावी राहून मिळेल ते काम करायचे ठरवले. दोघेही मुलीचे भविष्य रंगवीत होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर अचानक शॉर्ट सर्किटमुळे आयसीयूला आग लागली. त्यामध्ये तीन दिवसाच्या मुलीचा मृत्यू झाला. भनारकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple lost their new born baby in Bhandara Fire Case Latest News