निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, बलात्कार केल्यानंतर गुप्तांगात टाकला रॉड

अनिल कांबळे
रविवार, 26 जानेवारी 2020

निर्भया प्रकरणानंतर देश सुन्न झाला होता. यानंतर हैदराबादमध्ये झालेल्या घटनेनंतर रोष आणखीनच तीव्र झाला होता. हैदराबाद प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठार केल्याने याचे सर्वच स्तरावरून स्वागत झाले. यानंतर वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीती निर्माण होईल असे वाटत होते. मात्र, तसे काही झाले नाही. उलट निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती नागपुरात घडली आहे. 

नागपूर : दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चार युवकांनी युवतीचा बलात्कार केला. बलात्कारानंतर युवतीच्या गुप्तांगात रॉड टाकला होता. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. युवक-युवतींनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला होता. काहीच दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अशी घटना घटली. चार युवकांनी डॉक्‍टर युवतीचा बलात्कार केल्यानंतर जिवंत जाळले होते. अशीच कौर्याची सीमा गाठणारी घटना नागपुरातील पारडी परिसरात उघडकीस आली आहे. संस्थेतील सहकारी कर्मचाऱ्याच्या 19 वर्षीय बहिणीवर आरोपीने रात्रभर अत्याचार केला. यानंतर पहाटेच्या सुमारास युवतीच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड टाकला. पोलिसांनी योगीलाल रहांगडाले (वय 52) या नराधमाला अटक केली आहे. 

सविस्तर वाचा - बऱ्याच दिवसांनी मित्र घरी आल्याने घेतला सहभोजनाचा आनंद, मग घडले असे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व तिचा भाऊ पारडीतील एका संस्थेत काम करतात. याच संस्थेत योगीलाल रहांगडाले हा पर्यवेक्षक आहे. संस्थेलगतच असलेल्या एका खोलीत पीडित तरुणी, तिचा भाऊ अन्य एक तरुणी व रहांगडाले राहतात. 21 जानेवारीला तिचा भाऊ गावाला गेला होता. अन्य एक तरुणीही बाहेरगावी गेली होती. 

मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास रहांगडाले खोलीत आला. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याच्यातील सैतान जागा झाला. त्याने तरुणीशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने विरोध दर्शविल्याने तो संतापला. त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजतापर्यंत तिच्यावर बलात्कार केला व पसार झाला. सकाळी तरुणी शुद्धीवर आली. तिने आरडाओरड केली. बाजूला राहणारे कर्मचारी धावले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तरुणीने पारडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रहांगडाले याला अटक केली. त्याची 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. 

चेहऱ्यावर मारला स्प्रे

तरुणीने विरोध केल्याने नराधम योगीलालने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. ती काही क्षणातच बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास योगीलालने मानवतेची सीमा पार करून तरुणीच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड टाकला. शुद्धीवर आल्यानंतर तिने मोठ्याने किंचाळी फोडली. शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यामुळे तिचा जीव वाचला. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहे.

अवश्य वाचा - वाघ होता छाताडावर; तरीही हारली नाही हिंमत...अंगावर शहारे आणणारी ही बातमी वाचाच

4 डिसेंबर 2019

4 डिसेंबर 2019 रोजीची मध्यरात्र. डॉक्‍टर तरुणी रस्त्यावरून जात असताना गाडी खराब झाली. चार युवकांनी तिची मदत करण्याचा बहाणा करीत पाशवी अत्याचार केला. आपले पकडले जाऊ या भीतीने आरोपींनी तिला जिवंत जाळले. या घटनेनंतरही देश सुन्न झाला होता. तपास करण्यासाठी घटनास्थळावर आरोपींना पोलिस घेऊन गेले असता त्यांनी पळ काढला. यानंतर पोलिसांनी त्यांना ठार मारले. याचे सर्वच स्तरावरून स्वागत झाले. नागपुरातील घटनेनंतर पोलिस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl raped in Nagpur