पूरग्रस्त भागाचे पंचनामे नंतर करत बसा, आधी तत्काळ मदत द्या, कोण म्हणाले असे...  

अतुल मेहेरे
Wednesday, 2 September 2020

मौदा तालुक्यातील झुल्लर या गावात त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते. त्यातच धरणाचे पाणी नदीत सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पूर ओसरत असला तरी लोकांपुढे समस्या आहेत.

नागपूर  : पूर्व विदर्भावर यावर्षी पुराचा कहर बरसला. लोकांच्या शेतांत आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे ते उघड्यावर आले. अशा स्थितीतही सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. सरकार अजूनही पंचनामे करण्यासाठी धडपडतेय. पंचनामे नंतर केले तरी चालतील, पण पूरग्रस्तांना तत्काळ मदत सरकारने द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस आज पूर्व विदर्भाच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याचा दौरा तर करत आहेत. मौदा तालुक्यातील झुल्लर या गावात त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. त्यांच्यासोबत माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते. त्यातच धरणाचे पाणी नदीत सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता पूर ओसरत असला तरी लोकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला
 

पूरग्रस्त आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन आपला संसार निळ्या आकाशाखाली थाटत आहेत. या बाबतीत शासन कितीही गंभीर असल्याचे दाखवत असले तरी, दवाडीपार गावातील लोकांच्या समस्या येथे आल्याशिवाय कळणार नाहीत. या संकटाचे बळी पडलेल्यांना राज्य सरकारने तत्काळ मदत द्यावी, असे फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, वैनगंगेच्या पुरामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यात तीन दिवस घरं बुडून असल्यामुळे सर्व साहित्य खराब झाले.  अनेक कच्ची घरं जमीनदोस्त झाली. त्यामुळे अनेक लोकांनी आजूबाजूच्या घरांच्या गच्चीवर बस्तान मांडले आहे. सध्या तिथेच आपला संसार थाटलाय, ही स्थिती फारच भयावह असल्याच्या भावना देखील फडणवीसांनी व्यक्त केल्या. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पूरग्रस्त पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना भेट दिली.  तसेच पूरग्रस्त भागाचा आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.  त्यामुळे फडणवीसांचा हा दौरा राजकीय फायदा घेण्यासाठी तर नाही ना? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?
 

हे तर मानवनिर्मित संकट

दहिसरमधल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारला आवाहन केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ नये.' आता दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला असून ते म्हणाले, ''पूर्व विदर्भात भयावह परिस्थिती आहे. या स्थितीला मानवनिर्मित संकटच म्हणावे लागेल. वेळीच अलर्ट दिले नाहीत. परंतु आता तातडीने मदत देण्याची गरज आहे.', असंही त्यांनी नमूद केले. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give immediate help to Flooded citizens : Devendra Fadnavis