
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 25 दरवाजे 3 मीटरने, तर 8 दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून त्यातून तब्बल 22 हजार 782 क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला
गडचिरोली : भंडारा जिल्ह्यातील महाकाय गोसेखुर्द धरणातून तब्बल 22 हजार 782 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नदी, नाल्या फुगत असून जिल्ह्यात पुराची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदी, नाल्यांच्या काठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 25 दरवाजे 3 मीटरने, तर 8 दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून त्यातून तब्बल 22 हजार 782 क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चालू आठवड्यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाल्यांना पूर आला आहे.
जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर
इतिहासातील सर्वांत मोठा विसर्ग
गोसेखुर्द धरणातील जलसाठाही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शनिवारी (ता. 29) दुपारी 3 वाजता या धरणाचे 25 दरवाजे 3 मीटरने, तर 8 दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून 22 हजार 782 क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. गोसेखुर्द धरणातून 24 ऑगस्ट 2013 रोजी 16 हजार क्यूमेक्स, तर 9 सप्टेंबर 2019 रोजी 13 हजार 739 क्यूमेक्स पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे.
पाऊस कमी तरीही भरले जलसाठे
त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती गडचिरोली जिल्हा आपत्ती निवारण कक्षातर्फे देण्यात आली. यंदा पाऊस कमी असला, तरी मागील काही दिवसांत येत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना भरपूर पाणी आहे. यंदा भामरागडला दोनदा पुराचा सामना करावा लागला. शिवाय एटापल्ली तालुक्यातही पूरपरिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
नद्या फुगल्या
या सर्व पूरपरिस्थितीला गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्गसुद्धा काही प्रमाणात जबाबदार होता. आता पुन्हा या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने जिल्ह्यातील वैनगंगा, कठाणी, पाल, खोब्रागडी, सती नदी अशा अनेक नद्या व महत्त्वाच्या मोठ्या नाल्यांची जलपातळी वाढली आहे. त्यामुळे या नदी, नाल्यांच्या जलपातळीत वाढ झाली असून काठावरील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी सावधानता बाळगण्याचा इशारा देण्यात आला नाही.
हेही वाचा - मुंढेंच्या संकटात भर, नगरसेविका का जाणार पोलिसांत? वाचा सविस्तर
सिंचन नाही, पण संकट नशिबी.
गडचिरोली जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीवर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द व सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा दोन महाकाय धरणांचा प्रभाव पडतो. विशेष म्हणजे या दोन्ही धरणातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सुविधा फारशी मिळत नाही. पण, पुराचे संकट मात्र, नेहमीच सहन करावे लागते.
संपादन - अथर्व महांकाळ