"वेतन द्या अन्यथा महामंडळावर फौजदारी कारवाई करू"; एसटी कामगारांचा गंभीर इशारा

योगेश बरवड 
Sunday, 8 November 2020

लॉकडाऊनच्या काळात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली. परिणामी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे वेतन थकल्याने कामगारांमध्ये रोष उफाळून आला होता.

नागपूर ः आर्थिक अडचणीत असणाऱ्या एसटी महामंडळाने कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकविले आहे. दिवाळी तोंडावर येऊनही वेतन न मिळाल्याने संतापलेल्या एसटी कामगारांनी प्रसाशनाला वेतन प्रदान अधिनियमाची आढवण करून देत फौजदारी कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचा इशारा दिला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली. परिणामी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे वेतन थकल्याने कामगारांमध्ये रोष उफाळून आला होता. आंदोलनाचा पावित्रा स्वीकारताच प्रशासनाने एका महिन्याचे वेतन देत कामगारांची बोळवण केली. त्यानंतर ऑक्टोबरच्या थकित वेतनाचीही भर पडली. अनलॉक प्रक्रियेंतर्गत सर्वच क्षेत्र खुले होत आहे. 

क्लिक करा- आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून 

एसटीही पूर्ण क्षमतेने चालविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. पण, कामगारांचे थकित वेतन देण्यासंदर्भात कोणत्याच हालचाली होत नसल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे. सर्वच कामगार संघटनांकडून थकित वेतन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून आंदोलनांचीही घोषणा केली जात आहे. कायद्यातील तरतुदीनुसार एसटी महामंडळावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आता जोर घरू लागली आहे. 

कारवाईचे अधिकार कामगार आयुक्तांना आहे. यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. महामंडळावर फौजदारीची कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) तर्फे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांना देण्यात आले. सहकामगार आयुक्त अ.द. काकतकर व सहाय्यक कामगार आयुक्त गजानन शिंदे यांच्यासह नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती येथील कामगार उपायुक्त व सहायक कामगार आयुक्तांनाही निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. 

कायद्यातील तरतुदी 

वेतन प्रदान अधिनियम १९३६ या कायद्यातील कलम ५ अन्वये प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला किंवा ७ तारखेपूर्वी वेतन देणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्याला वेळेत वेतन न दिल्यास कलम २० अन्वये फौजदारी गुन्ह्याची तरतुद आहे. कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त व कामगार उपायुक्तांना आहेत. 

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने १ लाख कामगारांच्या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊलही कर्मचारी उचलू लागले आहेत. त्यामुळे वेतन द्या अन्यथा फौजदारी कारवाईसाठी तयार रहा. 
-मुकेश तिगोटे, 
सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give payments otherwise will do Criminal proceedings against ST mahamandal