आनंदाची बातमी...भूमिपुत्रांच्या रोजगाराचा पुनश्‍च हरिओम

Good News ... Local Youths Starts Employment
Good News ... Local Youths Starts Employment

नागपूर  : चौथ्या लॉकडाउनमध्ये खबरदारी घेत टप्प्याटप्प्याने एक-एक क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याअंतर्गत नागपूर ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील 2,179 उद्योगांनी उत्पादन सुरू केले असून, 43 हजार 10 कामगार काम करीत आहेत. त्यामुळे कामगारांची औद्योगिकक्षेत्रातील वर्दळ वाढू लागली आहे. कोरोनामुळे औद्योगिक व इतर व्यावसायिक आस्थापनामध्ये काम करणारे परराज्यातील कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहे. त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 

परवानगी घेऊन उत्पादन सुरू झालेल्या मोठ्या उद्योगांमध्ये एमआयडीसी हिंगणा येथील महिंद्रा अँड महिंद्रा, आर. सी. प्लास्टो, बजाज स्टील, एमआयडीसी कळमेश्वरमधील जेएसडब्ल्यू स्टील, बुटीबोरी एमआयडीसीतील सनविजय रोलिंग मिल्स, केईसी इंटरनॅशनल, सीएट टायर्स, शिल्पा स्टील, मोरारजी टेक्‍सटाइल्स, दिनशॅ फूड्‌स, मौदा येथील हिंदाल्को व विसाका इंडस्ट्रिज, बाजारगाव येथील सोलर एक्‍सप्लोसिव्ह, सूर्यलक्ष्मी स्पीनिंग मिल्स नगरधन (रामटेक) व निर्मल टेक्‍सटाइल्सचा (कोंढाळी) समावेश आहे. 

टाळेबंदीच्या प्रथम टप्प्यात साईस मिल, दाल मिल, अन्नप्रक्रिया उद्योग, औषधनिर्मिती, खत व बियाणे प्रक्रिया इत्यादी अत्यावश्‍यक उद्योगांना सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. नागपूर महानगरपालिका क्षेत्र वगळता कोठेही उद्योग सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्‍यकता नाही. महापालिका क्षेत्रात फक्त अत्यावश्‍यक वस्तूंचे उत्पादनास परवानगी दिली जात आहे. महापालिकाक्षेत्रातील उप्पलवाडी औद्योगिक सहकारी वसाहत, मॉं उमिया सहकारी औद्योगिक वसाहत, वांजरा व स्मॉल एरिया क्षेत्रातील इतर उद्योगांत उत्पादनास परवानगी नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहीम राबवीत आहे. कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर उद्योगांची नोंदणी केली जात आहे. त्यांना आवश्‍यक असणाऱ्या कामगारांची मागणी त्या ठिकाणी नोंदविली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची चमू प्रत्यक्ष उद्योगांना भेटी देऊन त्यांची मागणी पोर्टलवर नोंदवीत आहे. 

 कामगार मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना सामावून घेण्यासाठी उद्योजकांकडून नेमकी मागणी घेऊन तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 
डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री 

 

उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत उद्योजकांना पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योगांनी आपली कामगारांची मागणी पोर्टलवर नोंदवावी. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहीम राबवीत आहे. 
अ. प्र. धर्माधिकारी, उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com