हेच खरे योद्धे, तीन महिने जेवणाच्या व्यवस्थेसोबतच गावीही पोहचवले

राजेश रामपूरकर
Tuesday, 29 September 2020

अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेले गोपाल वासनिक यांनी खडतर परिस्थितीत अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण पूर्ण केले. लहापणीच वडिलांचे छत्र हरवल्याने आजोबांनी त्यांचे पालनपोषण केले. स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णयातून ते बांधकाम व्यवसायात आले.

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने अचानक टाळेबंदी केली. विदेशात गेलेले नागरिक, मजूर, पर्यटक असेल त्या ठिकाणीच स्थिरावले. लाखो मजूर पायी चालत घर जवळ करू लागले. अचानक आलेल्या संकटाने प्रशासनासह सर्वच सैरभैर झाले. मजुरांवर मोठे संकट कोसळले. या संकट काळात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्यांपैकी एक म्हणजे अभियंता व कंत्राटदार गोपाल वासनिक. 

नागपूर जिल्ह्यातील मांढळजवळील बोरी येथे त्यांचे रस्त्याचे काम सुरू होते. अचानक टाळेबंदी झाल्यामुळे येथे काम करणाऱ्या मजुरांना राहण्याची व जेवणाची सलग तीन महिने व्यवस्था केली. यावरच थांबले नाही, तर मजुरांना त्यांच्या गावालाही स्वतःचा खर्चाने पोहोचवून दिले. यासोबत कोविड योद्धा डॉक्टर, नर्सेस व पॅरामेडिकल स्टाफला ३५० पीपीई किटचे वाटप दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या विदर्भ विभागाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक बांधीलकीतून केले. त्यासाठी सदस्यांसह दात्यांकडून दोन लाखांचा निधी उभारला. 

खाण्यासाठी मरमर, खवय्यांना ना चिंता, ना भिती ! 

गोपाल वासनिक यांनी आउटर रिंग रोडने पायदळ जाणाऱ्या गरीब मजूर, सर्वसामान्य नागरिकांना हजारो मास्कचे वाटप केले. ते गेल्या एक दशकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स या देशव्यापी संस्थेचे विदर्भ विभागाचे कोषाध्यक्ष आहेत. डिक्कीच्या माध्यमाने मागासवर्गीय समाजातील तरुणांना व्यावसायिकतेचे, उद्यमशीलतेचे धडे देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनात विदर्भातील हजारो होतकरू तरुण-तरुणींनी त्यांचे यशस्वी व्यवसाय सुरू केले आहेत. डिक्कीच्या माध्यमातून नवोदित व्यावसायिकांसाठी अनेक शासकीय योजना आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. डिक्की विदर्भ चॅप्टरद्वारे मागासवर्गीय समाजातील महिलांना शिवणकला, होजिअरी व गारमेंट निर्मितीचे प्रशिक्षण दिले. त्यातील ३०० महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत त्या स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या आहेत. 

खडतर प्रवास 

अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेले गोपाल वासनिक यांनी खडतर परिस्थितीत अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण पूर्ण केले. लहापणीच वडिलांचे छत्र हरवल्याने आजोबांनी त्यांचे पालनपोषण केले. स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णयातून ते बांधकाम व्यवसायात आले. सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक खस्ता खाल्यानंतर २०० रुपये खिशात असताना रस्त्याचे काम मिळाले. हसतमुख आणि खिलाडूवृत्ती असलेले गोपाल यांनी मित्रपरिवाराच्या मदतीने पैसे गोळा केले. दिलेल्या मुदतीत काम संपवून मित्रांचे पैसेही परत केले. रस्ते बांधकाम व्यवसायासाठी लागणारी अद्ययावत यंत्रसामग्री, हॉट मिक्स प्लांट त्यांनी आपल्या प्रचंड परिश्रमातून उभारला आहे. कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश व्यावसायिकांवर मोठे संकट आले असताना डिक्कीशी संलग्न सदस्यांना यातून सावरण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी डिक्कीतर्फे विविध विविध विषयांवर वेबिनारही आयोजित करण्यात येत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopal Support to labourers in Corona Period