आजोबा-नातू रात्रभर अंधारात बसले होते घरात लपून, काय झाले होते त्यांना.......

सतिश डहाट
रविवार, 12 जुलै 2020

आपल्याला पोलिस घेऊन जातील व रूग्णालयात दाखल करतील, या भीतीने आजोबा आणि आठ वर्षीय नातू रात्रभर अंधारात कुलूप लावून लपून बसले. प्रशासनातील अधिकारी त्यांच्या शोधात सर्वत्र भटकले. परंतू त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी पोलिसांनी तहसील प्रशासनाला त्यांचा पत्ता काढण्यास सांगीतले. अखेर परिश्रमानंतर घराचा शोध घेण्यात आला. पाहतात तर काय, पोलिस प्रशासनाने तपासणी केली असता आजोबा-नातू घरात रात्रभर अंधारात बसून लपलेले आढळले...

कामठी (जि.नागपूर) : शहरालगतच्या येरखेडा ग्रामपंचायतीतील टीचर कॉलोनीतील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. याआधारे प्रशासकीय अधिका-यांसह
कर्मचा-यांनी त्या दोघांच्या अँटीजेन चाचणी करताना दिलेल्या पत्यावर भेट दिली. घर मिळाले, परंतू
रूग्ण आढळले नव्हते. रात्री उशिरापर्यत यांचा शोध घेण्यात आला. परंतू शोध न लागल्याने नवीन
कामठी पोलिस ठाण्याला तहसील प्रशासनाने पत्र देवून शोध घेण्याचे कळविले. आज सकाळी रूग्ण ईतर कुठे नसून घरामध्येच सामोरून दाराला कुलुप लावून रात्रभर अंधारात लपून बसल्याचे कळाले.
अखेर तहसील प्रशासनाने या दोन्ही रूग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्याची तंबी देताच प्रकरण उघडकीस आले.

अधिक वाचा : बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी, सरकारच्या नव्या सूचना जाहीर वाचा ...

दोन पॉझिटिव्ह रूग्णांचा पोलिसांनी लावला शोध
शुक्रवारी मिळालेल्या बाधीत तेरा रूग्णांपैकी येरखेडयात मिळालेले 60 वर्षीय इसम व त्याचा आठ वर्षाचा नातू हे दोन रूग्ण येरखेडा येथे नियमित राहात नसून मुंबईला राहातात. असे त्यांच्या घरी राहाणा-या भाडेकरूंनी सांगितले. स्थानिय प्रशासनाच्या काही कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी शहरातील हुतात्मा स्मारक येथील तपासणी केंद्रावर या दोन्ही रूग्णांनी स्वतः जावून अँटीजेन चाचणी करून घेतली. पत्ता "टिचर कॉलनी येरखेडा' असा देण्यात आला होता. या आधारावर प्रशासनाच्या कर्मचा-यांनी दुपारपासून शोध सुरू केला. मात्र पथक पोहोचण्याआधी हे आजोबा आणि त्यांचा नातू बेपत्ता झाल्याने रात्री उशिरापर्यंत शोध घेणे सुरू होते. तालुका प्रशासनाने स्थानिक पोलिस ठाण्यात कळवून या बाधीत रूग्णांचा शोध घेण्याचे सुचविले होते. शनिवारी पोलिस सकाळपासून त्यांचा शोध घेत होते. टिचर कॉलनी येथील काही नागरिकांच्या मदतीने या दोन्ही रूग्णांच्या मुंबई येथील नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना याबाबत माहिती देवून समजविण्यात आल्याने नंतर माहिती पडले की हे रूग्ण इतरत्र नसून घरामध्येच सामोरून दाराला कुलुप लावून रात्रभर अंधारात लपून बसल्याचे कळले.

अधिक वाचा: यांचाही होतो वाढदिवस...

प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची दिली तंबी
अखेर तहसील प्रशासनाने या दोन्ही रूग्णांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तंबी देताच प्रकरण उघडकीस आले. त्या राहत्या घरात एकूण पाच जण होते. त्यात दोन पुरूष व तिन महिलांचा समावेश आहे. नवीन पोलिस ठाण्याचे निरिक्षक संतोष बाकल यांनी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांना नेउन पुढील प्रक्रीया केला व आजोबा- नातू या दोन पॉझिटिव्ह रूग्णांना नागपूरच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. तीन महिलांना नागपूरच्या सिम्बायसिस विलगिकरण कक्षात क्‍वारंटाईन करण्यात आले.

संपादन : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandparents sat in the dark all night, hiding in the house