हिरवे स्वप्न फुलण्यापूर्वी जमिनीतच "दफन' झाले बियाणे, असे काय झाले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सुरू झाला व पेरणी योग्य पाऊस आल्याने महाबीज सोयाबीनचे बियाणे शेतात पेरले, पण ते उगवलेच नाही, अशा तक्रारी पं. स.च्या कृषी विभागात येऊ लागल्या. या चार दिवसांत जवळपास 46 शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या रिकाम्या बॅगा व त्यावरील कागदी मोहोर घेऊन तक्रारी केल्या आहेत.

पचखेडी(जि.नागपूर) : गतवर्षी सतत पाऊस पडत राहिल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला अन्‌ सर्व पीक घरात ठेवावे लागले. त्यामुळे मालाला योग्य भाव मिळाला नाही. यातून कसेतरी बाहेर पडावे म्हणून आताच्या खरीप हंगामात जोर लावून पेरणी केली. परंतु, आता पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी कशी, अशा दुहेरी संकटात तालुक्‍यातील शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी पं. स.चा कृषी विभाग तर घेत आहे, परंतु त्याचे निरसन केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अधिक वाचा : कचरा रे कचरा, किती वाढला तुझा भाव, वजनासाठी केला जातो हा प्रकार...

सर्वत्र बोगस बियाण्याची झळ
आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सुरू झाला व पेरणी योग्य पाऊस आल्याने महाबीज सोयाबीनचे बियाणे शेतात पेरले, पण ते उगवलेच नाही, अशा तक्रारी पं. स.च्या कृषी विभागात येऊ लागल्या. या चार दिवसांत जवळपास 46 शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या रिकाम्या बॅगा व त्यावरील कागदी मोहोर घेऊन तक्रारी केल्या आहेत. महाबीज 9305 या बियाण्याच्या बॅगचे लॉट नंबर ऑक्‍टोबर19-13-3201-67 पॅकिंग तारीख 2010 जानेवारी असा आहे. या लॉट नंबरसह 62,66,68,69,81,84,101 आदी लॉट नंबरच्या तक्रारी आहेत. बोगस बियाण्यांची झळ संपूर्ण तालुक्‍यात बसण्याची भीती व्यक्त होत आहे. काही लॉटमधील तक्रारकर्त्या प्रत्येक शेतकऱ्यांकडील चार -पाच बॅगांमध्ये ही समस्या उद्भवली असून आतापर्यंत 65 ते70 एकरमधील सोयाबीनबाबतच्या तक्रारी आलेल्या आहेत. यावर तपासणीनंतरच खरी परिस्थिती समोर येईल, असे बोलले जात असले तरी कुही पं. स.ने एक समिती नेमलेली आहे.

हेही वाचा :  लॉकडाउनच्या काळात सॅनिटायझरची लागली लत,परंतु आता भोगावे लागतील गंभीर परिणाम...

उगवण क्षमता केवळ 35 टक्‍केच !
ही समिती शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केव्हा तपासणी करणार व शेतकऱ्यास न्याय केव्हा मिळणार,
याबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे. आतापर्यंत मांढळ, कुही, चिपडी, नवेगाव, ससेगाव, आकोली, बारव्हा, गुसळगाव, वेलतूर, चनोडा, भटोडा, शिवनी, हरदोली, तारणा, डोंगरमौदा आदी गावांतील शेतकऱ्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. या बियाण्याची उगवण क्षमता ही 30 ते 35 टक्केच आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. या तक्रारींवर तातडीने पाऊल उचलावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हेही वाचा : टापटीपमध्ये पतीने घराबाहेर पाउल ठेवले,तोच पत्नी म्हणाली मला सारे माहित आहे आणि...

गणितच बिघडले !
मी 11एकरात 9305/67 हे सोयाबीन पेरले, पण ते उगवलेच नाही. त्यामुळे पं. स.कडे तक्रार केली. आता सोयाबीन उगवले नसल्याने वर्षभराचे गणितच बिघडले आहे. याची तत्काळ चौकशी करून न्याय मिळवून द्यावा.
कवळू वांधे
तक्रारकर्ता शेतकरी, ससेगाव

कठोर कार्यवाही व्हावी !
शेतकऱ्यांनी कसेबसे उधार उसने घेऊन काळ्या मातीत स्वप्न पेरले. मात्र, कंपनीने हे स्वप्न नेस्तनाबूद केले. तेव्हा कंपनीने शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाई द्यावी. त्यासाठी शासनाने कंपनीवर कडक कार्यवाही करावी.
बालूभाऊ ठवकर
जि. प. सदस्य (राजोला सर्कल)

न्याय मिळवून देणार
शेतकऱ्यांच्या तक्रारी घेणे सुरू असून लवकरच सर्व तक्रारी चौकशी समितीसमोर ठेवून शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्यात येईल. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
-राजेश पिल्लेवार
कृषी अधिकारी, पं. स. कुही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Before the green dream blossomed, the seeds were "buried" in the ground, what happened ...