तुमच्याकडून काहीच होत नाही; पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नीलेश डोये
Monday, 14 September 2020

रुग्णसंख्या वाढत असून, उपचाराअभावी मृत्यू होत आहे. रुग्णांचे हाल होत असल्यावरून पालकमंत्री राऊत यांनी चिंता आणि नाराजी व्यक्त केली. महापालिका अधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. महापालिकेच्या रुग्णालयात ६०० खाटा असल्याचे सांगण्यात आले.

नागपूर : कोरोना संसर्ग सुरू होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. रुग्णांचा सर्व भार मेयो व मेडिकलवर आहे. आतापर्यंत तुम्ही कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी का केली नाही, अशा शब्दात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय येथे कोरोनाबाबत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, कोरोनाच्या नोडल अधिकारी डॉ. माधवी खोडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सनदी अधिकारी मलीषा खत्री, मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचा - अमरावतीत विवाहितेवर तिघांनी केला अत्याचार; गुन्हा दाखल

रुग्णसंख्या वाढत असून, उपचाराअभावी मृत्यू होत आहे. रुग्णांचे हाल होत असल्यावरून पालकमंत्री राऊत यांनी चिंता आणि नाराजी व्यक्त केली. महापालिका अधिकाऱ्यांनी कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. महापालिकेच्या रुग्णालयात ६०० खाटा असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, या उपाययोजनांवर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे सर्व भार मेयो आणि मेडिकलवर आला आहे. तुमच्याकडून काहीच होत नाही, अशा शब्दात त्यांना सुनावले. सुविधा निर्माण करण्याच्या सूचना केल्या.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

पोलिसांसाठी खाटा हव्यात

मेयो, मेडिकलमध्ये पोलिसांसाठी १०-१० खाटा आरक्षित आहेत. परंतु, मोठ्या प्रमाणात कर्मचारी पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे आणखी १० अतिरिक्त खाटा आरक्षित ठेवण्याची मागणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली. रुग्ण वाढत आहेत. त्यांना खाटा पाहिजे. आरक्षित खाटा ठेवल्यास त्यांना तेथून हलवणे शक्य नाही. त्यामुळे तूर्तास खाटा आरक्षित ठेवता येणार नाही, असे मेयो, मेडिकलच्या अधिष्ठातांकडून स्पष्ट करण्यात आले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Guardian Minister caught the officers on the edge