
काही दिवसांपासून उपराजधानीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर घरी लग्नकार्य असतानाही डॉ. राऊत यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन नागपूरकरांना कोरोनासंदर्भातील नियम तंतोतंत पाळण्याचे आवाहन केले.
नागपूर : देशात कोरोना संक्रमितांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. विदर्भातही बाधितांच्या संख्येत नागपूर आघाडीवर आहे. नागरिक कोरोनासंदर्भातील नियमावलींचे पालन करताना दिसत नाहीत. अशीच रुग्णवाढ होत राहिल्यास कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. लॉकडाउन लावून नुकसान ओढवून घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सूचक इशारा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिला.
हेही वाचा - प्रफुल्ल पटेलांच्या महाविद्यालयाला न्यायालयाचा दणका, एका आठवड्यात ५ कोटी भरण्याचे आदेश
काही दिवसांपासून उपराजधानीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर घरी लग्नकार्य असतानाही डॉ. राऊत यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन नागपूरकरांना कोरोनासंदर्भातील नियम तंतोतंत पाळण्याचे आवाहन केले. कोरोना पॉझिटिव्ह आढळणारे सर्वाधिक रुग्ण २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. मॉल, बाजारपेठा, सिनेमागृहे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. मास्क लावणे किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. निष्काळजीपणाच धोक्याचा ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, चाचण्यात वाढविण्याचे निर्देश दिले असून प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. घरोघरी दूध, वृत्तपत्रे वितरण करणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. मॉल्स, दुकानदार, सभागृह, लॉन आदींना नोटीस बजावून एकावेळी ५० लोक उपस्थित राहणार नाहीत, याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूरच्या परिस्थितीवर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रेल्वेस्थानकावर आंदोलन; आंदोलक आणि सुरक्षा...
नियम माझ्यासाठीही -
मी शहराचा नागरिक व पालकमंत्री असल्याने कोरोनाचे सर्व नियम माझ्यासाठीही तसेच लागू असून त्यांचे पूर्ण पालन करीत आहे. घरी मुलाचे लग्न आहे. गर्दी होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. जवळच्या आप्तेष्टांनाही वधू-वरांना ऑनलाइन आशीर्वाद देण्याची सूचना केली आहे. पत्रकार मित्रांना घरच्या मंगल सोहळ्यात बोलावू शकत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. एकदा कोरोना होऊन गेला. लस घेतली आहे. यामुळे कोरोना होणार नाही, या अविर्भावात राहू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.