६० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून ८५ लाखांचा गंडा

अनिल कांबळे
Thursday, 5 November 2020

५० लाख रोख आणि ४० लाख ऑनलाइन देण्याची अट ठेवण्यात आली. करारापर्यंत ४० लाख देण्यास सांगितले. कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची पडताळणी करणे आणि इतर खर्चासाठी ८५ लाख रुपये आरोपींनी घेतले. या घटनेचा कालावधी १५ जून ते ५ ऑगस्ट २०१८ असा आहे.

नागपूर  : तब्बल ६० कोटी रुपयांचे कर्ज उभारून देण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी मिळून गुजरातमधील व्यापाऱ्याची ८५ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मुकेश ताराचंद गांधी (वय ४८, भगवतीनगर), प्रमोद ऊर्फ पप्पू क्रिष्णकुमार अवस्थी (रा. जगनाडे चौक), सुलतान भाई (रा. मुंबई), मेहंदीसिंग सत्तसिंग (रा. मुंबई) आणि शब्बीर भाई (रा. राजकोट) अशी आरोपींची नावे आहेत. परेश हरगोविंददास पटेल (वय ५७, रा. कपळगंज, गुजरात) असे फिर्यादीचे नाव असून ते उद्योजक आहेत. 

त्यांना गुजरातमध्ये शीतगृह निर्माण करायचे. त्याकरिता त्यांना ६० कोटी रुपये भांडवलाची आवश्यकता होती. त्यांनी आरोपी शब्बीर नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांनी नागपुरातील काही दलाल कंपनीच्या समभागांची बाजारात विक्री करून भांडवल उभे करण्याचे काम करतात, अशी माहिती दिली. शब्बीरने इतर आरोपींची त्यांच्याशी ओळखही करून दिली. 

ठळक बातमी - धमक्या मिळतात, पण मी जीवाला भीत नाही; शेवटपर्यंत ओबीसींसाठीच लढणार - वडेट्टीवार 
 

आरोपींनी त्यांना ६० कोटी रुपयांचे भांडवल उभे करून देण्याचे आमिष दाखवले. त्याकरिता कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची पडताळणी करावी लागेल व त्यानंतर १ कोटी रुपये खर्च व भांडवलावर ३ टक्के दलाली लागेल, असे सांगितले. हा सर्व खर्च करण्यास त्यांनी तयारी दर्शवली.

त्यांना पहिले ५० लाख रोख आणि ४० लाख ऑनलाइन देण्याची अट ठेवण्यात आली. करारापर्यंत ४० लाख देण्यास सांगितले. कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची पडताळणी करणे आणि इतर खर्चासाठी ८५ लाख रुपये आरोपींनी घेतले. या घटनेचा कालावधी १५ जून ते ५ ऑगस्ट २०१८ असा आहे. त्यानंतर आरोपींनी त्यांना समभागांची विक्री करून बाजारातून भांडवल उभे करून देण्यास टाळाटाळ केली. 

त्यांनी आरोपींकडे दिलेल्या पैशाची परत मागणी केली असता त्यांनी अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. याची तक्रार त्यांनी गुन्हे शाखेकडे दिली. गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास करून अजनी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणूक करणे आणि शस्त्राच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat traders financial fraud