पहिले होते घरोघरी पहेलवान, आता व्यायामशाळा ओस; का आली अस्सल मातीच्या खेळाला अवकळा?  

नरेंद्र चोरे 
Sunday, 13 September 2020

सत्तर व ऐंशीच्या दशकांत शहरात शंभराच्या वर आखाडे व व्यायामशाळा होत्या. त्यात घट होऊन आता ही संख्या ३० ते ४० वर आली आहे. त्यापैकी १० ते १२ आखाडेच सद्यःस्थितीत सक्रिय आहेत. 

नागपूर  : कुस्ती हा अस्सल मातीतला देशी खेळ. एकेकाळी नागपुरात कुस्तीची प्रचंड क्रेझ होती. मोहल्यामोहल्यात कुस्तीचे आखाडे व व्यायामशाळा होत्या. मात्र काळाच्या ओघात व्यायामशाळा बंद पडल्या. त्यामुळे पहेलवानही दिसेनासे झाले आहेत. आता आखाड्यांची जागा जिम व फिटनेस क्‍लबने घेतलीय.
  
नागपूरच्या कुस्तीचा सुवर्णकाळ जवळून पाहणारे विदर्भ कुस्ती संघटनेचे सचिव सीताराम भोतमांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तर व ऐंशीच्या दशकांत शहरात शंभराच्या वर आखाडे व व्यायामशाळा होत्या. त्यात घट होऊन आता ही संख्या ३० ते ४० वर आली आहे. त्यापैकी १० ते १२ आखाडेच सद्यःस्थितीत सक्रिय आहेत. 

धंतोली, महाल, सीताबर्डी, इतवारी, गांजाखेत, हंसापुरी, सतरंजीपुरा, तांडापेठ, सिरसपेठ, रेशीमबाग,कॉटन मार्केट, सदर, पाचपावली, जुना बगडगंज, तेलनखेडी, पारडी, सी. ए. रोड ही त्या काळात कुस्तीची मुख्य केंद्र होती. या ठिकाणी लाल मातीचे असंख्य आखाडे होते. अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तरुणांची गर्दी दिसायची.

महत्त्वाची बातमी - संतापजनक प्रकार! शेत दाखवण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक एक पसार 
 

केवळ शहरातच नव्हे, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आखाडे होते. वर्षभर नियमित स्पर्धा व दंगली व्हायच्या. मात्र, बदलत्या काळात कुस्तीलाही घरघर लागली. अनेक आखाडे व व्यायामशाळा बंद पडल्या असून, खुराडे बनले आहेत. त्यामुळे साहजिकच तरुणांमध्येही कुस्तीबद्दलचं आकर्षण कमी झालं आहे. 

ना स्पर्धा, ना करिअर आणि ना ही "जॉब' मिळण्याची गॅरंटी. त्यामुळे ऑलिम्पिक खेळ असूनही केवळ अनुकूल वातावरण नसल्यामुळे कुणालाच कुस्तीमध्ये करिअर करावे, असे वाटत नाही. केवळ "सिक्‍स पॅक्‍स' आणि पिळदार दंड व शरीर बनविण्याकडेच सद्य:स्थितीत तरुणाईचा अधिक कल दिसून येतो आहे. 

तरुणांमधील उदासीनता, पदाधिकाऱ्यांमधील भांडणे, स्पर्धांचा अभाव व राजाश्रयाच्या अभावामुळे या देशी खेळाची वाताहत झाली आहे. केवळ नागपूर शहरातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातच कुस्तीला घरघर लागली आहे. संघटनेचे पदाधिकारी कुस्ती वाढविण्याऐवजी राजकारणच करीत आले आहेत. सत्तेसाठी एकमेकांचे पाय खेचत आहेत. ऊठसूट कोर्टात जात आहेत. सद्य:स्थितीत नागपूर नगर आखाडा संघटन समिती व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड भांडणे व हेवेदावे आहेत. याचा फटका कुस्तीला बसतो आहे. 

अधिक माहितीसाठी - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात? 
 

कुणीही या खेळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही. जुने लोक भांडणात व्यस्त आहेत. पदाधिकाऱ्यांच्या भांडणांमुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे आता तरुणाईलाही या खेळात अजिबात रस राहिला नाही. कुस्तीला पूर्वीसारखा राजाश्रयही राहिला नाही. आज बहुसंख्य व्यायामशाळा आर्थिक अडचणींमध्ये आहेत. शासनाकडून त्यांना अनुदान मिळत नाही. कुस्तीच्या अधोगतीचे हेही एक प्रमुख कारण आहे. पैसा कमावण्याच्या उद्देशाने जागोजागी जिम व फिटनेस क्‍लब थाटण्यात आले. अशा ठिकाणी केवळ वेटलिफ्टर्स किंवा 'सिक्‍स पॅक्‍स' वाले तरुण तयार होतात, पहेलवान नव्हे . 

 

करिअर करण्यास तरुणाई अनुत्सुक 
कुस्ती हा गोरगरिबांचा खेळ असला, तरी त्याला पैशाचीही तितकीच गरज आहे. पूर्वीच्या काळात कुस्तीला राजाश्रय होता. त्यामुळे पहेलवान तयार होऊ शकले. पुरेशी शासकीय मदत मिळत नसल्यामुळे तरुणाई यात करिअर करण्यास इच्छुक नाही. कॉर्पोरेट जगताची साथ लाभल्यास कुस्तीला गतवैभव मिळू शकते. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
-गणेश कोहळे (माजी राष्ट्रीय कुस्तीपटू व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष)

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gymnasiums in Nagpur are fighting for their existence