esakal | मेरे रोजे को अल्लाने कबूल किया... गावकऱ्यांच्या मदतीसाठी तो पोचला चेन्नई
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सहा दिवसांपूर्वीच निघालेला मो. अझीम चेन्नईत पोहोचला. त्याने शहरात विविध ठिकाणी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या गावकऱ्यांना एका धार्मिक सभागृहात एकत्र केले. आपल्या गावातील युवक आपल्याला घ्यायला आल्याचे कळताच अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तब्बल 65 युवा कामगारांना ट्रकमध्ये घेऊन अझीम तीन दिवसांपूर्वी चेन्नईतून निघाला.

मेरे रोजे को अल्लाने कबूल किया... गावकऱ्यांच्या मदतीसाठी तो पोचला चेन्नई

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव रोजे ठेवत पवित्र कुराणाचे पालन करतात. मात्र, उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम युवकाने कोरोनामुळे चेन्नईत अडकलेल्या गावकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. आपला रोजा सोडून चेन्नईत अडकलेल्या 65 गावकरी कामगारांसह तो युवक घराकडे निघाला. युवकाचे नाव मोहम्मद अझीम असे असून, त्याच्या कार्याची उत्तर प्रदेश सरकारनेही दखल घेतली, हे विशेष. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मो. अझीम हा तिशीतील युवक उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहराजवळील एका गावात राहतो. मुरादाबाद येथे त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्याला पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू होते. परंतु, आपल्या गावातील 65 कामगार युवक चेन्नईत अडकल्याची माहिती त्याला मिळाली. त्यांची कशी मदत करता येईल, याबाबत अझीमने विचार केला. दुसऱ्याच दिवशी त्याने स्वतः ट्रकने चेन्नईला जाऊन गावकरी युवकांना गावात आणण्याचा निर्णय घेतला. त्याने आईवडिलांची परवानगी घेतली. एका मित्राला सोबत घेतले आणि निघाला चेन्नईच्या प्रवासाला. त्याच्या या निर्णयाचे आमदार-खासदारासह सर्वांनी कौतुक केले. मात्र, हे कर्तव्य बजावण्यासाठी त्याला रोजा सोडून द्यावा लागला.

सहा दिवसांपूर्वीच निघालेला मो. अझीम चेन्नईत पोहोचला. त्याने शहरात विविध ठिकाणी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या गावकऱ्यांना एका धार्मिक सभागृहात एकत्र केले. आपल्या गावातील युवक आपल्याला घ्यायला आल्याचे कळताच अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तब्बल 65 युवा कामगारांना ट्रकमध्ये घेऊन अझीम तीन दिवसांपूर्वी चेन्नईतून निघाला. तो कामगारांना घेऊन जात असताना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता नागपुरातील वर्धा रोड, जामठा येथील दीनबंधूच्या सहायता केंद्रावर थांबला. येथे सर्वांना जेवण मिळत असल्याचे त्याला कळले. त्याने लगेच ट्रकमधील सर्वांना खाली उतरवले. मो. अझीमने श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्‍वरदादा रक्षक यांची भेट घेतली. त्याने आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली. मदत केंद्रावर सर्व युवकांना जेवण देण्यात आले. 

हेही वाचा : कोरोना योद्‌ध्यांची होणार रॅपिड अँटिबॉडी टेस्ट... प्रशासनाची उच्च न्यायालयात माहिती 

तुमचे कार्य प्रेरणा देऊन गेले 
दिनबंधू मदत केंद्रावर केलेल्या आमच्या व्यवस्थेमुळे मला नव्याने प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. महाराष्ट्रीय जेवण आणि सेवा आयुष्यभर विसरणार नाही. "मेरा रमजान...मेरे रोजे को अल्लाने कबूल किया, मैं मेरे भाईयों की मदत कर रहा हूं. अल्ला को यही कबुल था', अशी प्रतिक्रिया मोहम्मद अझीम याने दिली. 
 
मोहम्मद अझीमचा सत्कार 
एका युवकाने हिंमत दाखवून गावातील युवकांच्या मदतीसाठी धाव घेतली. तसेच स्वतःजवळील पैसे खर्च करून ट्रकसह चेन्नईतून युवकांना घेऊन घरी परतणाऱ्या मोहम्मद अझीमच्या कार्याला दिनबंधू मदत केंद्राच्या कार्यकर्त्यांनी सलाम केला. मो. अझीमचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. आदरातिथ्य पाहून मो. अझीमचे डोळे पाणावले.