कोविड लस तयार होताच कोरोनायोद्धयांना मिळेल डोस, रुग्णालयांना मनपाचे पत्र

राजेश प्रायकर
Tuesday, 27 October 2020

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोविड-१९ वर नियंत्रण करण्यासाठी लस तयार करण्याबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. शहरातील जवळपास ५० जणांवर लसीकरणासंदर्भातील प्रयोग सुरू आहेत.

नागपूर : विविध पातळीवर कोविडवर नियंत्रणासाठी लस तयार करण्याचे प्रयोग सुरू आहेत. लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना डोस देण्यात येणार आहे. महापालिकेने शहरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांना पत्र पाठवून आरोग्यसेवक, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश दिले आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोविड-१९ वर नियंत्रण करण्यासाठी लस तयार करण्याबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. शहरातील जवळपास ५० जणांवर लसीकरणासंदर्भातील प्रयोग सुरू आहेत. लस देण्यात आलेल्यांना अद्यापही कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नाही. 

लशीच्या यशस्वितेनंतर सर्वप्रथम शहरातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने आरोग्यसेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती घेण्यास सुरुवात केली. शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्वच रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना कर्मचाऱ्यांची माहिती देण्यासाठी पत्र दिल्याचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. 

अधिक माहितीसाठी - एक लक्षात ठेवा! राष्ट्रवादी आता राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष; शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी दिला इशारा
 

शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला संकलित करून सादर करायची आहे. ही माहिती लवकरात लवकर शासनाकडे पाठवायची असून सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे सेवा देत असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती महानगरपालिकेद्वारे विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असल्याचे जोशी म्हणाले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष रुग्णालये, महानगरपालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल, खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग होम यांच्यासह शहरातील सर्वच नोंदणीकृत व अन्य रुग्णालयांनी सुद्धा आपली माहिती सादर करणे अनिवार्य आहे. सर्व रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय व्यावसायिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती homnmc.ngp@gmail.com या मेलवर बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावी, असे राम जोशी म्हणाले.

वादग्रस्त डॉ. गंटावार नोडल अधिकारी

या प्रकल्पाचे नोडल अधिकारी म्हणून महापालिकेतील वादग्रस्त डॉ. प्रवीण गंटावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांना माहिती पाठविताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास नोडल अधिकारी डॉ. गंटावार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी केले. 

संपादन  : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health workers will give the dose as soon as the covid vaccine is ready