"साहेब, नातेवाईकाचा जीव गेलाय हो, अंत्यसंस्काराला नेताना भाव तरी करू नका".. कोरोनाकाळात हरवली माणुसकी

 Hearse drivers are charging double rates for corona mortals
Hearse drivers are charging double rates for corona mortals

नागपूर : कोरोनामुळे सारेच विस्कळीत झाले असून, प्रत्येकाची जगण्याची धडपड सुरू आहे. दिवसेंदिवस बाधितांसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत असल्याने आता पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जागा नाही. खाजगीतील उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक खाजगी रुग्णालयांतील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांकडून माणुसकी हरवल्याची वागणूक मिळत आहे. अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली.  

त्रिमूर्तीनगर मार्गावरील खासगी रुग्णालय. ८१ वर्षीय मुकुंद गजभिये यांना शनिवारी उपचारासाठी दाखल केले. ४८ तासांच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने खासगी रुग्णालयाने नातेवाइकांना तत्काळ शव घेऊन जा, असे निर्देश दिले. नातेवाइकांनी महापालिकेच्या पुढाकारानेच अंत्यसंस्कार करण्यात येतात, ही बाब पुढे केल्यानंतर मात्र खासगी शववाहिकेतून शव हलवा, असे सुचविले.

कोरोनाबाधित शव स्मशानापर्यंत पोहोचण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली. आप्तस्वकीयाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आधीच दुःखी असतात. त्यात शववाहिकावाल्यांकडून असा दुःखाचा सौदा होत असल्याने कोरोना काळात माणुसकी हरविल्याचे चित्र नजरेसमोर उभे ठाकले आहे.

अव्वाच्या सव्वा भाव 

एका दिवसाच्या उपचारासाठी ४५ हजार रुपये रुग्णालय प्रशासनाला अदा केले. यानंतरही १० हजार रुपये शिल्लक आहेत, ते वसुली करण्यासाठी नातेवाइकांवर दबाव आणला जातो. सोमवारी ४ वाजता मृत्यू झाल्यानंतर रात्रीचे ९ वाजून गेल्यानंतरही शव येथे पडून होते. तर दुसरीकडे कोरोनाबाधित शव अवघे चार किलोमीटर अंतरावरील स्मशानभूमीत पोहोचवण्यासाठी दुःखी नातेवाइकांशी भाव केला जातो. ४ किलोमीटरसाठी १२ हजार रुपयांचा भाव शववाहिकावाल्यांनी स्वतःच ठरवून टाकला.

खासगी शववाहक क्षणात होतात दाखल 

कोरोनाने मृत्यू झालेल्याचे शव नातेवाइकांच्या स्वाधीन करता येत नाही. महापालिकेच्या पुढाकारातूनच अंत्यसंस्कार करण्यात येतात. ही माहिती असतानाही रुग्णालय प्रशासनाकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात येत नाही. नातेवाइकांनाच महापालिकेशी संपर्क साधा असे सुचविण्यात येते. तर खासगी शववाहिकावाले क्षणात रुग्णालयात कसे हजर होतात, हा प्रश्न उपस्थित होतो. सोमवारी ४ वाजता मृत्यू झाल्यानंतर ९ वाजून गेल्यानंतरही शव येथे पडून होते.

सगळेच नाॅट रिचेबल

एकीकडे कोरोनाबाधित व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्या शवाचा चेहरादेखील नातेवाइकांना बघू देत नाही. कोणत्या वेळी अंत्यसंस्कार करतात हेदेखील अनेकवेळा कळविण्यात येत नाही. दुसरीकडे, त्रिमूर्तीनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या डॉक्टरांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर कोणाकडून दाद मिळत नव्हती. पाच तासांपासून मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन नुसतेच खणखणत होते, अशी तक्रार नातेवाइकांनी केली.
 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com