गृहमंत्री अनिल देशमुखांनी पण आता संत्री वाटावी

home minister attended sunil shinde funeral
home minister attended sunil shinde funeral

नागपूर : सोनुबाबा नावाने प्रसिद्ध असलेले काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील शिंदे हाडाचे शेतकरी होते. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी आपला आमदारकीचा कार्यकाळ आणि संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. हिवाळी अधिवेशनात ते सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना संत्री देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून देत होते. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे शक्‍य नाही. पण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोनुबाबांनी घेतलेला वसा पुढे चालवावा आणि दर अधिवेशनात त्यांच्याप्रमाणेच संत्री वाटून, शेतकऱ्यांचे प्रश्‍न उचलून धरावे. हीच सोनुबाबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

सुनील शिंदे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी त्यांचे मूळ गाव सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी नाना पटोले होते. गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये आणि भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते.  

पटोले म्हणाले, स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना माहिती होत्या. त्या सोडविण्याचा सोनुबाबांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे येथे संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू झाला होता. शेतमालाला भाव मिळावा, यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. संत्रा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी व्रत सुरू केले होते. याचाच एक भाग म्हणून दर हिवाळी अधिवेशनात ते संत्री वाटून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडत होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सोनुबाबांनी घेतलेले व्रत आता त्यांनी पुढे सुरू ठेवावे.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, आम्ही लाडाने त्यांना सोनुबाबा म्हणायचो. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केले कार्य भरीव आहे. त्यांचे प्रयत्न आणि पुढाकारामुळे परीसरातील मुली शिकू शकल्या. खऱ्या अर्थाने त्यांनी शैक्षणिक क्रांती केली. त्यांनी शिकण्यासाठी फक्त सुविधाच तेवढ्या उपलब्ध करून दिल्या असे नाही, तर प्रत्येक मुलगी शिकली पाहीजे, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.

माजी आमदार प्रकाश गजभिये म्हणाले, सोनुबाबांच्या छत्रछायेत आम्हा वाढलो. समाजकारण, राजकारण शिकलो. त्यांच्या नेतृत्वात आंदोलने केली, मोर्चे काढले. त्यांच्या मार्गदर्शनातच खऱ्या अर्थाने आम्ही घडलो. कामाचा उत्साह दांडगा होता. त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत ते ऍक्‍टीव होते. अगदी आदल्या दिवशीसुद्धा ते शेतात जाऊन आले, लोकांना भेटले होते. एक पितृतुल्य नेता आम्ही गमावला आहे. भारताय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने माजी आमदार सुनील शिंदेंना श्रद्धांजली अर्पण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com