गृहमंत्री देशमुख यांनी केली घोषणा; ९०० कोटींचा सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट साकारणार, एक लाख घरे बांधणार

अनिल कांबळे
Monday, 25 January 2021

येत्या काळात सायबर गुन्हेगारांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्यावर उपाय शोधण्यात येणार आहे. त्यासाठी ९०० कोटी रूपये खर्च करून सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

नागपूर : भविष्यात सायबर गुन्हेगाराकडून सर्वाधिक धोका आहे. आतापर्यंत सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्याचा आकडा कोटींमध्ये आहे. त्यामुळे तब्बल ९०० कोटींचा सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. काही दिवसांतच जवळपास सर्वच शहरात ‘हायटेक सायबर पोलिस स्टेशन’ तयार करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

नागपुरात नव्याने तयार करण्यात आलेल्या महासंचालक कार्यालयाच्या शिबिर कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

येत्या काळात सायबर गुन्हेगारांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्यावर उपाय शोधण्यात येणार आहे. त्यासाठी ९०० कोटी रूपये खर्च करून सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

यामध्ये टेक्निकल तपास, डाटा सेक्युरिटी, अद्यावत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. येत्या गणराज्य दिनी मुंबईत ५ सुसज्ज असे सायबर पोलिस स्टेशनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तीन महिन्यांत ‘प्रोजेक्ट ११२’ सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ईमर्जन्सी क्रमांकावरून त्वरित घटनास्थळावर किंवा महिला, सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्याचे टार्गेट असणार आहे. त्यासाठी अडीच हजार दुचाकींची व्यवस्था करण्यात येणार आहे. खेड्यातील तंटामुक्ती योजनेला नव्याने पुनर्जिवित करण्यात येणार आहे, असेही देशमुख म्हणाले.

पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, माझ्या मतदार संघात एवढ्या सुसज्ज इमारतींचे लोकार्पण करण्यात आल्याचा वेगळा आनंद आहे. पोलिस विभागाला जी मदत हवी आहे, ती करायला आम्ही तयार आहे. गृहमंत्र्यांनी विशेष लक्ष देऊन भव्य इमारत साकारण्यात आली आहे, याचा अभिमान आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावणा मांडली. संचालन डीसीपी संदीप पखाले तर आभार प्रदर्शन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.

जाणून घ्या - बापरे! वाळू तस्करांनी नायब तहसीलदारांच्या पोटावर चाकूने केले सपासप वार

एक लाख घरे बांधणार

पोलिसांच्या मालकीच्या जागेवर पोलिस हाऊसिंगच्या माध्यमातून एक लाख निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव तयार आले. अर्थविभाग आणि संबंधित विभागाची मंजूरी मिळाली असून लवकरच घर बांधण्याचा शुभारंभ करण्यात येईल. नागपुरात महासंचालक शिबीर कार्यालय नव्हते, त्यामुळे प्राधान्याने ते बांधून लोकार्पण करण्यात आले. काही दिवसांतच पोलिस आयुक्तालय आणि ग्रामिण अधीक्षक कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात येईल. तसेच नागपुरात सुसज्ज असे पोलिस मुख्यालय बांधण्याचा प्रस्ताव आहे, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले.

७० हजार घरे बांधून द्या

राज्य पोलिस दलाचा डोलारा २ लाख २० हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आहे. सध्या पोलिसांना ३२ हजारच घरे पोलिसांकडे आहे. त्यामुळे येत्या काळात ७० हजारांपर्यंत घरे बांधून द्यावीत, अशी विनंती महासंचालक हेमंत नगराळे यांनी केली. महासंचालक झाल्यानंतर फक्त १७ दिवसांत मला नागपुरात एवढे भव्य कार्यालय बांधून दिले, ही इतिहासातील पहिलीच घटना असावी. पोलिस विभागाकडून पोलिस पाल्यांसाठी शाळा, वसतीगृह, अभ्यास केंद्रे चालविल्या जात आहे. यामधून मोठमोठे अधिकारी घडत आहेत.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

पोलिसांनी मिळाल्या घराच्या किल्ल्या

तीन कोटी ५०लाख रुपये खर्चून इंदोरा आणि पाचपावली येथे पोलिसांसाठी घरे बांधण्यात आली. गृहमंत्री देशमुख आणि पालकमंत्री राऊत यांच्या हस्ते प्रातनिधिक स्वरूपात १० पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना घराच्या किल्‍ल्या सोपवून घरे सोपविण्यात आली. तसेच या इमारतींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Deshmukh says to launch Rs 900 crore cyber security project